Breaking : ‘सरकार माझ्यावर पाळत ठेवतंय, माझी हेरगिरी करुन काय साध्य होणार?’ खासदार संभाजीराजेंचा सवाल

| Updated on: May 31, 2021 | 6:24 PM

आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप संभाजीराजे यांनी केलाय. संभाजीराजे यांच्या ट्वीटमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Breaking : सरकार माझ्यावर पाळत ठेवतंय, माझी हेरगिरी करुन काय साध्य होणार? खासदार संभाजीराजेंचा सवाल
खासदार संभाजीराजे छत्रपती
Follow us on

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतलेले खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आता सरकारवर गंभीर आरोप केलाय. संभाजीराजे यांनी याबाबत ट्वीट केलंय. आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप संभाजीराजे यांनी केलाय. राज्याचा इंटेलिजन्स विभाग पाळत ठेवत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्याबाबत संभाजीराजे यांच्या ट्वीटमुळे एकच खळबळ उडाली आहे. या ट्वीटमध्ये संभाजीराजे यांनी केंद्र की राज्य सरकार असा उल्लेख केलेला नाही. मात्र राज्य सरकारच्या इंटेलिजन्स विभागाकडून संभाजीराजे यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचं संशय व्यक्त केला जातोय. (MP Sambhaji Raje’s serious allegation that he is being watched by the government)

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. अशावेळी संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतलीय. संभाजीराजे यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेतल्यानंतर तीन दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी राज्य सरकारसमोर 3 कायदेशीर पर्याय आणि 4 गोष्टी सुचवल्या होत्या. त्यानंतर आज संभाजीराजे यांनी सरकारवर हा गंभीर आरोप केलाय.

संभाजीराजेंचं सरकारला अल्टिमेटम

संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला मराठा समाजासाठी 5 गोष्टी सांगितल्या आहेत. या 5 गोष्टींवर 7 जूनपर्यंत निर्णय घेतला नाही तर आम्ही कोरोना वगैरे पाहणार नाही. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर रायगडावरुन आंदोलनाला सुरुवात करु. मी स्वत: या आंदोलनात उतरणार अशी घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मराठा आंदोलनाचं वादळ उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना कोणत्या 5 गोष्टी सांगितल्या?

1. मराठा तरुणांच्या नियुक्त्या : 9 सप्टेंबर 2020 पर्यंत नियुक्त्या झाल्यात त्यांना रुजू करुन घ्या हे सांगितलं, मग राज्य सरकार थांबलंय का? लोकांच्या भावनांशी का खेळताय? गरिब मराठ्यांना न्याय द्या.

2. सारथी संस्था : शाहू महाराजांच्या नावाने सारथी संस्था उभी केली, मात्र त्याची अवस्था काय आहे? सारथीला स्वायत्तता दिली तर आरक्षणापेक्षाही उत्तम ठरेल. माझं हे मोठं वक्तव्य आहे. सारथीला चालना मिळाली तर समाज बदलेल. सारथीचं अध्यक्षपद मला अजिबात नको. सारथीला 1 हजार कोटी द्या. कोव्हिड काळात पैसा नाही म्हणता, पण आम्ही प्लॅन करु. आता 50 कोटी दिले तर त्यामध्ये आम्ही काय प्लॅन करु? पैसे द्यायचे नसतील तर ती सारथी संस्था बंद करा. शाहू महाराजांच्या नावे अशी संस्था नको.

3. अण्णासाहेब महामंडळ : या महामंडळातून गरीब मराठ्यांना उद्योग उभं करुन देऊ शकता. दहा लाखाचं लिमिट आहे. मात्र ही मर्यादा 25 लाख करा. कर्ज काढायला गेल्यावर जमीन मॉर्गेज मागतात, मात्र जमिनीच नाहीत तर देणार काय?

4. वसतीगृह : प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभा करा. ते तुमच्या हातात आहे, ते करा.

5. ओबीसींच्या सवलती द्या : 70 टक्के गरीब मराठा समाज आहे. मी शाहूंचा वंशज आहे. गरिबांवर अन्याय होऊ देणार नाही. ज्या सवलती शिक्षणामध्ये ओबीसींना मिळतात, त्या गरीब मराठ्यांनाही द्या.

संबंधित बातम्या :

ओबीसींमध्ये नवे प्रवर्ग शक्य आहे का?, ठाकरे, पवार, फडणवीस, चव्हाणांनी सांगावं; खासदार संभाजी छत्रपतींचं आवाहन

Sambhajiraje Chhatrapati : “6 जूनपर्यंत अल्टिमेटम, अन्यथा रायगडावरून आंदोलन करणार अन् मी स्वत: आंदोलनात उतरणार”

MP Sambhaji Raje’s serious allegation that he is being watched by the government