एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयाला मुंबई उत्तर पश्चिममधून उमेदवारी जाहीर

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून अखेर उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मागच्या अनेक दिवसांपासून मुंबई उत्तर पश्चिममधून उमेदवार कोण असणार? या बद्दल विविध तर्क-वितर्क लढवले जात होते. राजकीय चर्चांचा बाजार गरम होता. महायुतीमध्ये भाजपाला ही जागा जाणार असही बोललं जात होतं. पण अखेर शिवसेना शिंदे गटाला ही जागा मिळाली आहे.

एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयाला मुंबई उत्तर पश्चिममधून उमेदवारी जाहीर
eknath shinde uddhav thackeray
| Updated on: Apr 30, 2024 | 11:21 AM

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून अखेर महायुतीकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाने उमेदवारच नाव जाहीर केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याला एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी दिली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ते भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार असतील. त्यांचा सामना महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्याशी होणार आहे. अमोल किर्तीकर हे गजानन किर्तीकर यांचे पुत्र आहेत. गजानन किर्तीकर हे शिवसेना शिंदे गटात आहेत. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी संजय निरुपम यांचं नाव महायुतीकडून चर्चेत होतं. महायुतीसोबत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रवींद्र वायकर आणि संजय निरुपम या दोघांच्या उमेदवारीला जोरदार विरोध केला होता.

रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय नेते मानले जायचे. मातोश्रीशी बरोबर त्यांची विशेष जवळीक होती. महापालिकेत स्थायी समितीवर ते होते. नगरसेवक, आमदार असा त्यांचा प्रवास राहिला आहे. आता ते लोकसभेवर जाण्यासाठी निवडणूक लढणार आहेत. रवींद्र वायकर यांच्यावर घोटाळ्याचे आरोप झाले होते. ईडीकडून त्यांची चौकशी झाली होती. ईडीने त्यांच्या निवासस्थानी छापा मारला होता. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्याविरोधात तक्रार केली होती. रवींद्र वायकर यांच्यामागे चौकशीचा हा ससेमिरा लागलेला असताना अचानक त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

प्रतिस्पर्धी उमेदवारावरही गंभीर आरोप

ईडीच्या कचाट्यातून मान सोडवून घेण्यासाठी त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. आता त्यांना थेट लोकसभेच तिकीट देण्यात आलाय. उद्धव ठाकरेंना आपल्या एकेकाळाच्या जवळच्या सहकाऱ्याविरोधात प्रचार करावा लागणार आहे. त्यांच्यासमोर अमोल किर्तीकरांच आव्हान आहे, ज्यांना ठाकरे गटाने मुंबई उत्तर पश्चिममधून उमेदवारी दिलीय. अमोल किर्तीकरांवरही खिचडी घोटाळ्याचे आरोप आहेत.


रवींद्र वायकर कोण?

2014 मध्ये युतीचं सरकार राज्यात आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात रवींद्र वायकर यांची गृहराज्य मंत्रीपदी वर्णी लागली होती. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आघाडी सरकार आल्यानंतर वायकर यांना मुख्यमंत्री कार्यालयात चीफ कोऑर्डिनेटर बनवलं होतं. पण त्यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळाली नव्हती.