‘वरातीमागून घोडे नाचवणं बंद करा, मुंबईकरांची चेष्टा थांबवा’, दरेकरांचा मुंबई महापालिकेवर हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवरही टीकास्त्र

| Updated on: Jun 09, 2021 | 6:34 PM

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी हिंदमाता आणि सायन सर्कल परिसरात गुडघाभर पाण्यातून पाहणी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई महापालिकेवर जोरदार टीका केलीय.

वरातीमागून घोडे नाचवणं बंद करा, मुंबईकरांची चेष्टा थांबवा, दरेकरांचा मुंबई महापालिकेवर हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवरही टीकास्त्र
हिंदमाता, सायन सर्कल परिसरात प्रवीण दरेकरांकडून पाहणी
Follow us on

राहुल झोरी, टीव्ही 9 मराठी, मुंबई : पहिल्याच पावसात मुंबईची दैना झाल्याचं आज पुन्हा पाहायला मिळत आहे. आज सकाळपासून पावसाने मुंबईत जोरदार हजेरी लावत मुंबईची दाणादाण उडवून दिली. मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचले. त्यामुळे सायन, चेंबूर, अंधेरी, कुर्ला, गोरेगाव, वरळीसह मुंबईतील विविध भागात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी हिंदमाता आणि सायन सर्कल परिसरात गुडघाभर पाण्यातून पाहणी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई महापालिकेवर जोरदार टीका केलीय. (Praveen Darekar inspects Hindmata, Sion Circle area)

सायन सर्कल आणि हिंदमाता परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. या भागात गुडघाभर पाण्यातून प्रवीण दरेकर यांनी पाहणी केली. त्यावेळी त्यांनी परिसरातील नागरिक आणि दुकानदारांची चौकशी केली. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. यात महापालिकेचा निष्क्रियपणा दिसून येतोय. हायटाईड आणि पाऊस हा मुंबईकरांना वर्षोनवर्षे माहिती आहे. पण गेल्या वर्षभरात जे नियोजन करायला हवं होतं ते झालं नाही. त्यामुळे पुरता बट्ट्याबोळ झालाय. आता तरी शहाणं व्हावं. सत्ताधाऱ्यांनी वरातीमागून घोडे नाचवणं बंद करावं. येणाऱ्या 8 ते 10 दिवसांत पूर्ण यंत्रणा कामी लावून पावसावर लक्ष केंद्रीत करावं अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केलीय.

‘मुख्यमंत्रीसाहेब, मुंबईकरांची चेष्टा करु नका’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतील पावसाचा आढावा घेण्यासाठी महापालिकेत गेले. मला मिळालेल्या माहितीप्रमाणे ते फक्त 5 ते 10 मिनिटे थांबले. एवढ्या वेळेत काय पाहणी करणार? काय उपाययोजना करणार? यंत्रणा कशी कार्यान्वित करणार? असा सवालही दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना केलाय. मुंबईकरांची चेष्टा करु नका. अशा अडचणीच्या काळात मुंबईकरांच्या पाठिशी उभे राहिला नाहीत तर मुंबईकर माफ करणार नाहीत. महापालिकेनं आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आम्ही दोष देत नाही पण आता जे काही दिवस तुमच्या हातात आहेत त्यात मुंबईकरांना दिलासा द्या, अशी मागणी दरेकर यांनी केलीय.

मंत्री अनिल परबांना सवाल

दरेकर यांनी ट्विटरवरुनही मुंबई महापालिका आणि सत्ताधारी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. पुन्हा एकदा ‘मुंबईची तुंबई झाली’, मुंबईत पाणी भरवून दाखवलं! मुंबईतील तुंबलेल्या पाण्याला मुख्यमंत्री जबाबदार असतील, असं यापूर्वी अनिल परब म्हणाले होते. परंतु आत्ता तुंबलेल्या मुंबईला मुख्यमंत्री जबाबदार की महापालिका जबाबदार? हे त्यांनी सांगावं!, असं आव्हान दरेकर यांनी दिलं आहे.

संबंधित बातम्या :

अंबरनाथमध्ये पहिलाच पाऊस, शेकडो जखमा, कुठे भिंत कोसळली, तर कुठे नाल्याचं पाणी सोसायटीत शिरलं

VIDEO : सब वेमध्ये पाणी तुंबलं, गाडी अडकली, क्रेनने बाहेर काढली

Praveen Darekar inspects Hindmata, Sion Circle area