म्हणून मुख्यमंत्र्यांकडून तुकाराम मुंढेंची नागपुरात बदली : महापौर

| Updated on: Jan 22, 2020 | 10:09 AM

तुकाराम मुंढे यांची नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

म्हणून मुख्यमंत्र्यांकडून तुकाराम मुंढेंची नागपुरात बदली : महापौर
Follow us on

नागपूर : सत्ताधारी आणि महापालिका आयुक्तांमध्ये संघर्ष व्हावा, म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुद्दाम तुकाराम मुंढे यांची नागपुरात बदली केली असावी, असं मत नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त (Nagpur Mayor on Tukaram Mundhe) केलं आहे. तुकाराम मुंढे यांची नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे यांनी तुकाराम मुंढे दिले, त्यासोबतच महापालिकेचं अनुदान, थांबवलेली विकास कामं आणि कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगही द्यावा, अशी मागणी संदीप जोशींनी केली. आम्हीसुद्धा शिस्तप्रिय आहोत, तुकाराम मुंढेंसोबत विकासाठी काम करु, अशी ग्वाही संदीप जोशी यांनी दिली. नागपूर महापालिकेवर सध्या भाजपची सत्ता आहे.

नागपूरच्या विकासासाठी आम्ही तुकाराम मुंढेंसोबत आहोत. विकासाच्या विरोधात असलेल्याशी संघर्ष होईल, अशी प्रतिक्रिया संदीप जोशी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना दिली.

तुकाराम मुंढे हे गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या एड्स नियंत्रण प्रकल्पाचे संचालक म्हणून काम पाहत होते. याआधी नागपूर महापालिका आयुक्तपदी अभिजित बांगर काम करत होते.

महाविकासआघाडी सरकार आल्यानंतर भाजपचा गड असलेल्या नागपूर महापालिकेत तुकाराम मुंढेंची बदली झाली आहे. मुंढे हे शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. येत्या काळात भाजप आणि तुकाराम मुंढे यांच्यात संघर्षाची शक्यता नाकारता येत नाही.

येत्या दोन वर्षात नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंढे यांची आयुक्तपदी बदली करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

तुकाराम मुंढे यांची ‘बदली’पूर्ण कारकीर्द

नागपूर जिल्हा परिषदेवर 2008 मध्ये तुकाराम मुंढे यांची सीईओ म्हणून नियुक्ती झाली. त्याच दिवशी त्यांनी शाळेला भेटी दिल्या आणि गैहजर शिक्षकांचं निलंबन केलं होतं. वैद्यकीय कारभारात अनियमितता दिसल्याने काही डॉक्टरांनाही निलंबित केलं होतं.

सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना तुकाराम मुंढेंनी वाळू माफियांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. त्यांना वाळू माफियांच्या रोषाचाही सामना करावा लागला. पंढरपूर मंदिर समितीच्या चेअरमनपदी नियुक्ती झाल्यानंतर मुख्यमंत्रीवगळता इतरांचं व्हीआयपी दर्शन त्यांनी बंद केलं होतं.

नवी मुंबईत महापालिका आयुक्तपदी बदली झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरु केली आणि तिथेच तुकाराम मुंढे सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आले. नवी मुंबईतही त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला.

नवी मुंबईतून तुकाराम मुंढे यांची पुण्यात पीएमपीएमएल अध्यक्षपदी बदली झाली. पुण्यात गेल्यानंतर त्यांनी तोट्यात असलेल्या पीएमपीएमएलचा महसूल वाढवण्यासाठी अनेक पाऊलं उचलली, नियम बदलले आणि नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून सुविधा दिल्या. पण पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या निलंबनामुळे त्यांची कारकीर्द पुन्हा एकदा चर्चेत आली.

पुण्यातून तुकाराम मुंढे यांची बदली नाशिकला करण्यात आली. तिथे ते किमान एक वर्ष पूर्ण करतील, अशी अपेक्षा होती. पण एका वर्षाच्या आतच त्यांची मंत्रालयात बदली करण्यात आली. नागरिक तुकाराम मुंढेंच्या कामाचं नेहमीच कौतुक करतात आणि त्यांच्या मागे खंबीरपणे उभे असतात. पण राजकारण्यांना त्यांचं एवढं वावडं का? असा प्रश्न उपस्थित केला जातो.

Nagpur Mayor on Tukaram Mundhe