कार्यकर्त्याला कोपर, नरेंद्र मोदींची शरद पवारांना ‘कोपर’खळी

| Updated on: Oct 13, 2019 | 2:37 PM

शरद पवारांनी कार्यकर्त्याला कोपर मारुन मागे ढकलल्याचा व्हिडीओ वायरल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

कार्यकर्त्याला कोपर, नरेंद्र मोदींची शरद पवारांना कोपरखळी
Follow us on

जळगाव : ‘फोटो काढायला घुसलेल्या कार्यकर्त्याला ‘एका नेत्याने’ कोपराने ढकललं. जे आपल्या कार्यकर्त्यांना मोठं होऊ देत नाहीत, ते तुमच्या मुलांना काय मोठं करणार?’ अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव न घेता कानपिचक्या (Narendra Modi on Sharad Pawar) लगावल्या. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात आयोजित केलेल्या पहिल्याच सभेत मोदींनी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महायुती सरकार स्थापन करण्याचा विश्वास व्यक्त केला.

‘आमच्या व्यासपीठावर तरुण तडफदार नेते उपस्थित आहेत. यांच्याकडे एक नेते सोफ्यावर बसले आहेत. दोन चार जणांनी
त्यांना उठवलं. त्यांना माळ घालत असताना एक कार्यकर्ता फोटो काढायला घुसला. तर या मोठ्या, नाव आणि दबदबा असलेल्या नेत्याने त्याला कोपराने ढकलून दिलं. जे आपल्या कार्यकर्त्यांना मोठं होऊ देत नाहीत, ते तुमच्या मुलांना काय मोठं  करणार?’ असा प्रश्न विचारत नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर (Narendra Modi on Sharad Pawar) निशाणा साधला.

शरद पवार फोटोत घुसणाऱ्या एका कार्यकर्त्याला कोपराने मागे ढकलत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला  होता. अकोला येथे बाळापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम गावंडे यांच्या प्रचार कार्यक्रमात हा प्रकार घडला होता. त्यावरुनच नरेंद्र मोदींनी पवारांना लक्ष्य केलं.

काय घडलं होतं?

सभेत कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना गुलाबांचा एक मोठा हार घातला. तो हार घालताना एक कार्यकर्ता शरद पवार यांच्यासोबत फोटोत दिसण्यासाठी त्या हारात डोकं घालत होता. मात्र, कार्यकर्त्यांना समजून घेत कलाकलाने काम करणाऱ्या पवारांनी या कार्यकर्त्याचा चांगलाच हिरमोड केला.

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवारांना हार घालत असताना एक कार्यकर्ता अचानक पवारांच्या उजव्या हाताखालून त्या गुलाबाच्या हारात डोकं घालत होता. मात्र, पवारांनी त्याला तात्काळ आपल्या हाताच्या कोपरानं बाजूला केलं. यानंतर या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील कार्यकर्ता कोण हे समजू शकलेलं नाही.

‘कसं काय जळगाव?’ असा प्रश्न विचारत नरेंद्र मोदींनी नेहमीच्या शैलीत मराठीतून भाषणाला सुरुवात केली. ‘येत्या पाच  वर्षांसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकारसाठी पुन्हा एकदा तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो  आहोत. लोकसभा निवडणुकीवेळी दिलेल्या आशीर्वादाचे आभारही व्यक्त करायचे आहेत’ असं मोदी म्हणाले.

VIDEO: कार्यकर्त्याची हारात ‘घुसखोरी’, शरद पवारांचा कोपरानं ‘सर्जिकल स्ट्राईक’

5 ऑगस्टला भाजप आणि एनडीए सरकारने अभूतपूर्व निर्णय घेतला. जम्मू काश्मीरमधील गरीब, महिला यांच्या विकासासाठी एक पाऊल उचलण्यात आलं. जम्मू काश्मीर आणि लडाख हा फक्त जमिनीचा एक तुकडा नाही, तर भारतमातेचं शीर आहे.

दुर्दैवाने आपल्या देशातीक काही राजकीय पक्ष आणि नेते राष्ट्रहितासाठी घेतलेल्या या निर्णयावरुन राजकारण करण्यात गुंतले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाषणं बघा. जम्मू-काश्मीरविषयी देशाला जे वाटतं, त्याच्या विरुद्ध यांचे विचार आहेत. शेजारी देशांशी यांची मतं मिळती-जुळती आहेत, असा निशाणा नरेंद्र मोदी यांनी साधला.

हिंमत असेल, तर कलम 370 पुन्हा लागू करु, असं आगामी किंवा त्यानंतर येणाऱ्या निवडणुकांच्या घोषणापत्रात जाहीर करा, असं आवाहनही नरेंद्र मोदींनी विरोधकांना केलं.

गेल्या पाच वर्षांतील आमच्या कामगिरीमुळे विरोधकही हैराण आहेत. शिवसेना-भाजप नेतृत्वातील सरकार चैतन्यशील असल्याचं त्यांनाही पटलं आहे, अशा टोला मोदींनी लगावला.

‘नव्या भारताचा नवा जोश जगाला दाखवायचा आहे. जगभरात भारताचा डंका वाजण्यामागे 130 कोटी देशवासियांचे हात आहेत. भारताचा आवाज जगभरात ताकदीने ऐकला जात आहे. प्रत्येक देश भारताच्या साथीने उभा आहे. आपल्या खांद्याला खांदा लावून पुढे जाण्यासाठी उत्साही आहे.’ असंही मोदी म्हणाले.