सिल्व्हर ओकला गेल्यावर 50 मिनिटांच्या भेटीत काय घडलं?; अजित पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं…

Ajit Pawar on Silver Oak Meeting : मी सिल्व्हर ओकवर गेलो तेव्हा, पवारसाहेब होते, सुप्रिया होती...; त्या 50 मिनिटांच्या भेटीत काय झालं? अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितलं...

सिल्व्हर ओकला गेल्यावर 50 मिनिटांच्या भेटीत काय घडलं?; अजित पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं...
| Updated on: Jul 15, 2023 | 1:21 PM

नाशिक 15 जुलै 2023 : अजित पवार यांनी बंड करत आपल्या समर्थक आमदारांसह भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. 2 जुलैला अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली. त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची, आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीतील भाषणात अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. या टीकेला शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही उत्तर दिलं. या बंडानंतर अजित पवार काल रात्री पहिल्यांदाच शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर गेले.

शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार घरात पडल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. त्यामुळे त्यांच्यावर काल छोटी शस्त्रक्रिया पार पडली. त्यांना कालच डिस्चार्जही देण्यात आला. प्रतिभा पवार या हॉस्पिटलमधून घरी परतल्या. तेव्हा अजित पवार त्यांना भेटण्यासाठी सिल्हर ओकवर गेले होते. या भेटीवेळी काय झालं हे अजित पवार यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

अजित पवार म्हणाले…

प्रतिभाकाकींचं काल ऑपरेशन झालं. त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. दुपारी त्यांचं ऑपरेशन झालं तेव्हाच मी त्यांना भेटायला जाणार होतो. पण इतर कामांमुळं मला उशीर झाला. कामातून थोडा वेळ मिळाला तेव्हा मी फोन केला. तर सुप्रियाने सांगितलं की दादा आम्ही आता सिल्व्हर ओकला निघालो आहोत. तर तू तिकडे ये,असं अजित पवार म्हणाले.

काकींचं ऑपरेशन झाल्यामुळं मला काकींना भेटायचंच होतं. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आणि कुटुंब कुटुंबाच्या ठिकाणी. भारतीय संस्कृतीत कुटुंबाला विशेष महत्व आहे. आधी आम्हाला आजी-आजोबांनी संस्कार केले. पुढेही आई-वडील, काका-काकींनी शिकवलं आहे की कामाच्या ठिकाणी काम, कुटुंबाला मात्र वेळ दिलाच पाहिजे. त्यानुसार मी काकीला भेटलो. तिथं पवारसाहेब, सुप्रिया पण होती. यावेळी काकींची विचारपूस केली. पुढचे वीस दिवस काकींना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे, असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यात त्यांनी प्रतिभा पवार यांना हॉस्पिटलमधून घरी आणलं. तेव्हा शरद पवार यांनी खास तयारी केल्याचं सांगितलं. शरद पवार यांनी प्रतिभा पवार यांच्या स्वागतासाठी फुलं ठेवली असल्याचं म्हटलं आहे.

सुप्रिया सुळे यांचं ट्विट

सुंदर अशी अनमोल भेट…!
आम्ही आईला घेऊन हॉस्पिटलमधून घरी आलो तर बाबांनी तिच्या स्वागतासाठी हि अशी सुंदर फुले ठेवली होती…