Navneet Rana : संजय राऊत आणि अनिल परब यांना अटक होणार, नवनीत राणा यांच्या विधानाने खळबळ

आता पुढचा नंबर शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिवसेना नेते अनिल परब यांचा आहे. या दोघांना अटक होणार, असं विधान नवनीत राणा यांनी केलं आहे.

Navneet Rana : संजय राऊत आणि अनिल परब यांना अटक होणार, नवनीत राणा यांच्या विधानाने खळबळ
संजय राऊत आणि अनिल परब यांना अटक होणार, नवनीत राणा यांच्या विधानाने खळबळ
Image Credit source: tv9
| Updated on: Jul 20, 2022 | 2:42 PM

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि शिवसेना यांच्यातलं राजकीय वैर गेल्या काही महिन्यात शिगेला पोहोचलं आहे. त्यातल्या त्यात शिवसेनेतले काही नेते हे तर नवनीत राणा यांच्या टार्गेटवरच आहेत. हनुमान चालीसा प्रकरणांमध्ये संजय राऊत (Sanjay Raut) विरुद्ध राणा दाम्पत्य हा वाद किती गाजला आहे महाराष्ट्राने पाहिलं आहे. यात संजय राऊत हे सतत राणा यांच्यावर टीका करत होते, मात्र त्यानंतर आज नवनीत राणा यांनी एक मोठं खळबळजनक विधान केलं आहे. संजय पांडे यांच्या नंतर आता पुढचा नंबर शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांचा आहे. या दोघांना अटक होणार, असं विधान नवनीत राणा यांनी केलं आहे. त्यामुळे आता पुन्हा नावात पेटण्याची शक्यता आहे.

आता राऊत, परबांचा नंबर-राणा

याबाबत बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, जेव्हा ईडी कुणावरती कारवाई करते, तेव्हा ती पूर्ण पुरावे आणि साक्षीनिशी करते. पुराव्याशिवाय ईडी कडून कोणतीही कारवाई केली जात नाही. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या नंतर महाराष्ट्रात खूप नेत्यांचे नंबर येणार आहेत. मागच्या सहा-सात महिन्यातले दिवस पाहिल्यास अनिल परब यांची अनेकदा ईडी कडून चौकशी झाली आहे. अनिल परब यांनी दिलेली उत्तरही ईडी साठी समाधानकारक नाहीत. त्यामुळे त्यांना पुन्हा पुन्हा चौकशीला बोलावलं जात आहे. तसेच संजय राऊत यांचीही अनेकदा ईडीकडून चौकशी झाली आहे. त्यांना ईडीचे अनेकदा नोटीसा येत आहेत. आता संजय पांडे जेलमध्ये गेले आहेत. त्यानंतर यांचा आता नक्कीच नंबर लागणार आहे, असा इशाराच राणा यांनी देऊन टाकला आहे.

किशोरी पेडणेकरांचं राणा यांना सणसणीत उत्तर

तसेच ईडी एक संस्था आहे. जी आपल्या स्वतःच्या कायद्याने चालते. तसेच ती संविधानाचा सन्मान करते आणि खोट्याला सजा देते. खऱ्याला न्याय देते, असेही नवनीत राणा यावेळी म्हणाल्या आहेत. तर नवनीत राणा या छान भविष्यवाणी करतात, असा टोला शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी नवनीत राणा यांना लगावला आहे. न्यायिक बाजू आणि जे काही आहे यावर मी बोलणार नाही, मात्र शिवसेनेचे जे दोन्ही वाघ आहेत, ते या सगळ्याला निभावून पुढे जातील. मात्र आतापर्यंत दिल्ली गल्लीत बघत नव्हती मात्र आता दिल्ली गल्लीही बघायला लागली, असा सणसणीत टोलाही त्यांना लगावला आहे.