वसूली गँगचा पर्दाफाश होतोय, वानखेडेंना अटक झाल्यावर अनेक गोष्टींचा उलगडा होणार, मलिकांचा दावा

| Updated on: Nov 02, 2021 | 2:45 PM

मुंद्रा पोर्ट आणि जेएनपीटी पोर्ट येथे हजारो कोटींचे अमली पदार्थ मिळाल्यानंतरही एनडीपीएस कायद्यातंर्गत कारवाई का होत नाही? असे प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबी आणि भाजपवर हल्लाबोल केला.

वसूली गँगचा पर्दाफाश होतोय, वानखेडेंना अटक झाल्यावर अनेक गोष्टींचा उलगडा होणार, मलिकांचा दावा
नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us on

मुंबई : समीर वानखेडे यांनी एनसीबीच्या माध्यमातून हजारो कोटींची वसुली केली आहे. याप्रकरणाची चौकशी केली तर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतील. मुंद्रा पोर्ट आणि जेएनपीटी पोर्ट येथे हजारो कोटींचे अमली पदार्थ मिळाल्यानंतरही एनडीपीएस कायद्यातंर्गत कारवाई का होत नाही? असे प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबी आणि भाजपवर हल्लाबोल केला. दरम्यान काल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले. (Nawab Malik claims that there will be many revelations after arrest of Sameer Wankhede)

‘भाजपनेच महिलांवर टिप्पणी करण्याचा स्तर खाली आणला’

काल जयदीप राणा या ड्रग पेडलरबद्दल मी काही तथ्य माध्यमांसमोर ठेवले. मात्र तेव्हापासून एक अपप्रचार सुरु आहे की, मी फडणवीस यांच्या पत्नीला या प्रकरणात खेचत आहे. मात्र हा आरोप चुकीचा असल्याचे मलिक यांनी सांगितले. आज पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांनी भाजपनेच महिलांचा अवमान केल्याचा आरोप केला. कालच किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या आई आणि बहिणीचा उल्लेख केला. काही दिवसापूर्वी संजय राऊत यांची पत्नी, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नीला ईडी कार्यालयात चौकशीला बोलावले होते. सोमय्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या पत्नीचे नाव घेऊन वारंवार आरोप करत असतात. या सर्व महिला नाहीत का? असा प्रश्न उपस्थित करत मलिक यांनी महिलांचा अवमान करण्याचा स्तर भाजपने खाली आणला, आम्ही नाही, असा हल्लाबोल केला.

‘देवेंद्र फडणवीस यांनी आता माफी मागावी’

कालच्या पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषद घेऊन काही आरोप केले. त्यात ते माझ्या जावयाच्या घरी गांजा सापडला. मला त्यांना सांगायचे आहे की, देवेंद्रजी तुम्ही तुमचे खास मित्र समीर वानखेडेकडून पंचनामा मागवून घ्यावा. त्यात कुठेही गांजा किंवा आपत्तीजनक वस्तू प्राप्त झाली याचा उल्लेख नाही. ज्यादिवशी जावयाच्या घरी छापा टाकण्यात आला त्यावेळी मीडियाला खोट्या बातम्या देऊन आम्हाला बदनाम केले गेले. माध्यमांना आज मी तो पंचनामा देत आहे. आता देवेंद्रजींनी माफी मागणार का?, असा सवाल मलिक यांनी केलाय.

‘जावयाची चार्जशीट कमकुवत करण्याचा आरोप चुकीचा’

‘मी जावयाची चार्जशीट कमकुवत करण्यासाठी एनसीबीवर आरोप करतोय, असेही सांगितले गेले. फडणवीस हे स्वतः वकील आहेत. एनडीपीएस कायद्यानुसार सहा महिन्याच्या आत चार्जशीट दाखल करावी लागते. समीर खान आणि सजनानीच्या केसमध्ये चार्जशीट दाखल झालेली आहे. त्यामुळे मी चार्जशीट कमकुवत करत नाही, याही प्रकरणात आपण माफी मागणार का? असंही मलिक म्हणाले.

इतर बातम्या :

‘मंत्रिमंडळाला नैतिक अधिकार उरला नाही, उद्धवजी… आता तरी सरकार बरखास्त करा’, चंद्रकांत पाटलांची खोचक टीका

‘अनिल देशमुखांवरील कारवाई योग्यच, अजित पवारांनी चौकशीला सामोरं जावं’, रामदास आठवलेंचा सल्ला

Nawab Malik claims that there will be many revelations after arrest of Sameer Wankhede