नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक; एनसीबीकडून 10 तास कसून चौकशी

| Updated on: Jan 13, 2021 | 9:32 PM

गेल्या 10 तासांपासून सुशांत सिंग आत्महत्या आणि ड्रग्ज प्रकरणी त्यांची चौकशी सुरू होती. त्यानंतर आता एनसीबीने अटक केल्याची माहिती समोर येत आहे.

नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक; एनसीबीकडून 10 तास कसून चौकशी
nawab malik
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना मोठा झटका बसला आहे. मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. दहा तासांच्या चौकशीनंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समीर खान यांना अटक केली आहे. त्यामुळे आधीच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाने बेजार झालेल्या राष्ट्रवादीला मलिक यांच्या जावयावर झालेल्या कारवाईमुळे आणखी एक झटका बसला आहे.

मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समन्स बजावले होते. मुच्छड पानवाला ड्रग्ज प्रकरणात हे समन्स बजावण्यात आले होते. याप्रकरणी त्यांची सकाळपासून चौकशी सुरु होती.

नवाब मलिक यांची कन्या निलोफर यांचे समीर खान हे पती आहेत. ड्रग्जप्रकरणातील संशयित करण सजनानी यांच्यासोबत समीर खान यांचा गुगल पे द्वारे 20 हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. सजनानी याने ड्रग्ज पुरवल्यामुळे समीर यांनी त्यांना 20 हजार रुपये गुगल पेने पाठवल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनसीबीने समीर यांना बोलावलं होतं.

एनसीबीने गेल्या आठवड्यात ब्रिटीश नागरिक करण सजनानी आणि राहिला फर्निचरवाला यांच्याकडून 200 किलोचे ड्रग्ज जप्त केले होते. याप्रकरणी केम्प कॉर्नर येथील प्रसिद्ध मुच्छड पानावाला यालाही अटक करण्यात आली असून त्याला न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याशिवाय मुच्छड पानवाला दुकानाचे मालक रामकुमार तिवारी यालाही एनसीबीने ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अटक केली आहे. गांजा, ड्रग्ज विकताना तिवारी पकडला गेला होता. त्यामुळे त्यालाही तुरुंगात टाकण्यात आलं आहे.

नवाब मलिकांनी राजीनामा द्यावा

नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्याबाबतचे ट्विट करून माहिती दिली आहे. नवाब मलिक यांचे जावई आणि ‘ड्रग्जचा लॉर्ड’ समीर खान यांना एनसीबीने अटक केली आहे. आता मलिक यांनी ठाकरे सरकारमधून पायउतार व्हावे, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.