Sharad Pawar Hospitalized: बाबा ऐकत नाहीत… शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करताच सुप्रिया सुळेंचे व्हॉट्सअप स्टेटस
Sharad Pawar Hospitalized: ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुप्रिया सुळे यांनी वडिलांना नेमकं काय झालं याबाबत माहिती दिली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती खालावल्यानंतर आज पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर तातडीने खासदार सुप्रिया सुळे या ब्रीच कँडी रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. दरम्यान, त्यांनी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवत वडिलांना नेमकं काय झालं आहे हे सांगितले आहे.
सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला ‘बाबांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डी-हायड्रेशन झाल्यासारखे वाटत आहे. त्यांनी थोडं हळू जायला हवं आणि प्रवास कमी करायला हवा. बाबा काहीच ऐकत नाहीत. त्यांना त्यांचे काम प्रचंड आवडते. तुम्ही करत असलेल्या सर्व काळजीबद्दल धन्यवाद’ असे म्हटले आहे.
यापूर्वी 4 नोव्हेंबर रोजी शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हाही सुप्रिया सुळे यांनी स्टेट्सद्वारे माहिती दिली होती. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांना प्रकृतीशी संबंधीत समस्यांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती कशी आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काल शरद पवार बारामतीतील त्यांचे निवासस्थान असलेल्या गोविंद बागेत शेतातील उसाची पाहणी करताना दिसले. यावेळी त्यांच्यासोबत युगेंद्र पवार हे उपस्थित होते. गोविंद बागेतील या ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पादनात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले. मागील पंधरा वर्षांपासून या शेतातून प्रति एकर सुमारे ६० टन ऊस उत्पादन येत होते. मात्र AI तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर हे उत्पादन प्रति एकर १२० टनपर्यंत वाढले आहे. शरद पवार यांनी या आधुनिक शेतीची पाहणी करत शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या या प्रयोगाची माहिती घेतली. त्यानंतर आज त्यांची प्रकृती खालावली आहे.