मंत्रिपदाच्या तुकड्यासाठी शिवेंद्रराजे भाजपमध्ये, जयंत पाटील यांचा हल्लाबोल

| Updated on: Aug 29, 2019 | 1:04 PM

भाजपने राष्ट्रवादीतून आलेल्या सर्वांची निष्ठा पाहिल्याशिवाय मंत्रिमंडळ न देण्याचा फतवा काढला, तर शिवेंद्रराजे काय करतील? असा खोचक सवाल जयंत पाटील यांनी शिवेंद्रराजे भोसले यांना विचारला.

मंत्रिपदाच्या तुकड्यासाठी शिवेंद्रराजे भाजपमध्ये, जयंत पाटील यांचा हल्लाबोल
Follow us on

सातारा : मंत्रिपदाच्या तुकड्यासाठी शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) भाजपमध्ये गेले, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी टीका केली. भाजपने राष्ट्रवादीतून आलेल्या सर्वांची निष्ठा पाहिल्याशिवाय मंत्रिमंडळ न देण्याचा फतवा काढला, तर शिवेंद्रराजे काय करतील? असा खोचक सवालही जयंत पाटलांनी विचारला.

‘वारे बदलल्यावर पक्ष बदलणारे पुन्हा माघारी पक्षात येऊ शकतात. कोणतंही संकट येऊ नये, म्हणून काही पक्ष बदलतात. ज्यांच्यात लढण्याची ताकद, मानसिकता नाही, जे कायम घड्याळाच्या चिन्हावर निवडून आले त्यांनी पक्ष बदलावा.’ असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

भाजपने राष्ट्रवादीतून आलेल्या सर्वांची निष्ठा पाहिल्याशिवाय मंत्रिमंडळ न देण्याचा फतवा काढला, तर काय करतील शिवेंद्रराजे? असा सवाल पाटील यांनी विचारला. राष्ट्रवादी पक्षाने शिवेंद्रराजेंना कायम आपुलकीची वागणूक दिली असताना, त्यांना अगदी काटा टोचला तरी शरद पवार साहेबांचा आपुलकीने फोन यायचा. पण आता असा आपुलकीचा फोन भाजपमधून येईल का? असा सवाल केला. दुसरेही राजे त्या वाटेवर जात असल्याचं सांगत आम्ही कोणाला मुजरा करायला पक्ष बदलणार नाही. त्यांना येणारी निवडणूक जड जाईल असा इशारा जयंत पाटील यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा साताऱ्यात दाखल झाली. सभेला खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, रुपाली चाकणकर, मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील यांच्यासह जिल्हयातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सभेत अमोल कोल्हे यांनी खासदार उदयनराजेंवर अप्रत्यक्ष टीका केली. तुमच्याकडे आम्ही आदराने बघत होतो. तुम्ही कोणाच्या मांडीला मांडी लावून बसायला निघाला आहात, असा टोला लगावला. या सभेला साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर अनुपस्थित राहिल्यामुळे भाजपच्या प्रवेशाबाबत पुन्हा एकदा दुजोरा मिळत आहे.