भाजपचे माजी मंत्री शिवसेनेच्या वाटेवर : नवाब मलिक

| Updated on: Feb 07, 2020 | 11:32 AM

मोदी लाट ओसरली आहे. दिल्लीत महाराष्ट्रातील भाजप नेते प्रचार करत आहेत, पण महाराष्ट्रातच यांची बोट बुडणार, अशी टीका नवाब मलिक यांनी केली

भाजपचे माजी मंत्री शिवसेनेच्या वाटेवर : नवाब मलिक
Follow us on

मुंबई : भाजपची लाट ओसरली आहे. अनेक माजी मंत्री शिवसेनेत जाण्यास उत्सुक आहेत. आठवड्याभरात मोठे फेरबदल पाहायला मिळतील, असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी (Nawab Malik on BJP) केला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तीन दिवसांपूर्वी येत्या काही महिन्यात महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागतील, असं वक्तव्य केलं होतं. देवेंद्र फडणवीसही सत्तापालट होण्याविषयी बोलत आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रात ‘कमल खिलेगा कार्यक्रम’ सुरु होणार, ही बातमी पेरली जात आहे. मात्र मोदी लाट ओसरली आहे. दिल्लीत महाराष्ट्रातील भाजप नेते प्रचार करत आहेत, पण महाराष्ट्रातच यांची बोट बुडणार, अशी टीका नवाब मलिक यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना केला.

काँग्रेस राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाऊन निवडणूक लढवलेल्या नेत्यांनाही पक्ष बदलायचा आहे. ज्यांनी भाजप पक्ष वाढवण्यासाठी आयुष्य खर्ची काढलं, त्यांच्यावरही अन्याय झाला. त्यामुळे तेही पक्ष बदलण्याच्या मनस्थितीत आहेत, असं म्हणत नवाब मलिक यांनी अप्रत्यक्षपणे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला.

भाजपचे नेते आणि माजी मंत्री महाविकास आघाडीच्या संपर्कात आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी ते उत्सुक आहेत. एका आठवड्यात मोठे फेरबदल पाहायला मिळतील, असा दावा मलिक यांनी केला.

लोकांचा भाजपवरील विश्वास उडाला आहे. लवकरच सगळ्यांना समजेल की भाजपची लाट आता ओसरली आहे, त्यांना आताच सावध होणं गरजेचं आहे, असं नवाब मलिक म्हणाले.

कर्जमाफी जाहीर झाली आहे. पुढच्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. उपसमिती स्थापन झाली आहे, शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होणार आहे, अशी माहितीही नवाब मलिक यांनी (Nawab Malik on BJP) दिली.