आम्ही हिरोईन आहोतच, पण…, रुपाली चाकणकर यांचा लोणीकरांना इशारा

| Updated on: Feb 02, 2020 | 3:37 PM

बबनराव, आम्ही हिरोईन आहोतच, पण विचाराने. आम्ही जिजाऊ, सावित्रीच्या लेकी आहोत, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी बबनराव लोणीकरांचा समाचार घेतला

आम्ही हिरोईन आहोतच, पण..., रुपाली चाकणकर यांचा लोणीकरांना इशारा
Follow us on

पुणे : बबनराव, आम्ही हिरोईन आहोतच, पण विचाराने. आम्ही जिजाऊ, सावित्रीच्या लेकी आहोत, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी बबनराव लोणीकरांचा समाचार घेतला (Rupali Chakankar). भाजप आमदार बबनराव लोणीकर यांची जीभ पुन्हा घसरली. त्यांनी एका महिला अधिकाऱ्याबाबत बेताल वक्तव्य केलं. त्यावरुन रुपाली चाकणकर यांनी लोणीकरांचा खरपूस समाचार घेतला. तसेच, तुमच्या सारख्या व्हिलनचा सुपडा साफ करायला आम्हाला जास्त वेळ लागणार नाही, असंही त्या म्हणाल्या (Babanrao Lonikar Controversial Statement).

“बबनराव, आम्ही हिरोईन आहोतच, पण विचाराने. आम्ही जिजाऊ सावित्रीच्या लेकी आहोत. तुमच्यासारखे व्हिलन आजूबाजूला असतील, तर त्यांचा सुपडा साफ करायला आम्हाला फार वेळ लागणार नाही. तहसीलदार म्हणून ज्या आमच्या हिरोईन आहेत, त्याच तुम्हाला पुरुन उरतील”, असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी बबनराव लोणीकरांवर टीकास्त्र सोडलं.

तसेच, “लोणीकरांनी बोलताना विचार करुन बोलावे. सत्तेत असताना तुम्हाला सत्तेची मस्ती होती. आता सत्ता गेल्यावर तरी जमिनीवर या. अशा व्यक्तींना आमदार पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा”, अशी मागणीही रुपाली चाकणकर यांनी केली.

बबनराव लोणीकर काय म्हणाले?

माजी पाणी पुरवठा मंत्री आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी पुन्हा एकदा बेताल वक्तव्य केलं. बबनराव लोणीकरांनी जालन्यातील परतूर तालुक्यात कऱ्हाळाच्या 33 केव्ही उपकेंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात महिला तहसिलदारांचा थेट हिरोईन असा उल्लेख केला. बबनराव लोणीकर म्हणाले, “अधिवेशनाआधी शेतकऱ्यांचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा मोर्चा होऊ शकतो. या मोर्चाला 50 हजार लोक यावेत. तुम्ही सांगा कुणाला आणायचं? देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील की सुधीर मुनगंटीवार यांना आणायचं? तुम्हाला कोण वाटतंय ते सांगा, नाहीतर एखादी हिरोईन आणायची असंल तर हिरोईन पण आणू. जर कुणी हिरोईन नाहीच भेटली, तर तहसिलदार मॅडम आहेच.”

बबनराव लोणीकरांच्या या बेताल वक्तव्यावर राजकीय नेत्यांकडून संतापजनक प्रतिक्रिया येत आहे.