मी दादांचं मत साहेबांच्या कानावर घातलेलं, ते एकटेच खमके…, विलिनीकरणाच्या चर्चांमध्ये बड्या नेत्याचा पटेल-तटकरेंवर निशाणा
Ajit Pawar NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावरून पुन्हा राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या बदललेल्या भूमिकेवर अंकुश काकडे यांनी प्रश्न उपस्थित केला. अजित पवार हयात असताना नेमकी काय चर्चा झाली होती, याबाबत त्यांनी महत्त्वाचा दावा केला.

दीपक कापरे, पुणे टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांमधील विलिनीकरणाच्या चर्चा आता पुन्हा रंगत आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन्ही गटांनी एकत्र येण्याची तयारी केली होती. पण अजित पवारांच्या अकाली निधनामुळे हे विलिनीकरण होऊ शकलं नाही. त्यानंतर या मुद्द्यावरुन मोठं राजकारण झालेलं पाहायला मिळालं, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या, पक्षाच्या अध्यक्षही झाल्या. दरम्यान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी विलिनीकरणाच्या चर्चांना अर्थ नसल्याचं यापूर्वी म्हटलं होतं. पण आता मात्र त्यांनी त्यांच्या वक्तव्यावरुन यूटर्न घेतल्यानंतर एकच चर्चा सुरु झाली आहे. यावरुनच आता आणखी एका बड्या नेत्याची प्रतिक्रिया समोर आली आहे.
सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल विलीनीकरण संदर्भात अशा प्रकारची चर्चा झाली नाही असे सांगत होते आणि आमच्या नेत्यांना खोटं पाडण्याचा प्रयत्न करत होते हे त्यांच्या फायद्यासाठी करत आहेत असे सांगत होते. सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल दोघांनी 90 अंशाचा यु टर्न घेतलाय आता म्हणतायेत अशी चर्चा झाली होती. आता म्हणतायेत की विलीनीकरणासंदर्भात चर्चा झाली होती. त्यावेळेस आम्ही बोलत होतो ते काय खोटं बोलत होतो का? असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नेते अंकुश काकडे यांनी सवाल उपस्थित केला आहे.
अजित दादा हयात असताना दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रीकरण व्हावं यासाठी मी प्रयत्न केले, याला साक्षीदार शरद पवार साहेबांची निकटवर्तीय विठ्ठल मणियार आहेत. अनेक वेळेस दादांच्या बरोबर प्रवासात माझी चर्चा झाली. दादांचं काय मत आहे, हे मी साहेबांच्या कानावर घातलं, असंही त्यांनी यावेळी टीव्ही९ मराठीशी बोलताना सांगितलं आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये विलीनीकरणाची चर्चा कुठेही नाही. प्रफुल पटेल यांनी पवार साहेबांची भेट झाल्यानंतर स्वतःहून सांगितलं की त्यांच्याशी माझी विलीनीकरणा संदर्भात चर्चा झाली आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल त्यावेळेस सांगत होते की कोणतीही विलीनीकरणाची चर्चा झाली नाही. त्यावेळेस दोन-चार नेत्यांनी विलीनीकरणासाठी नाहीचा पाढा लावला. त्यावेळेस विलीनीकरणाच्या चर्चेसाठी आमच्या पक्षातून चार ते पाच नेते असायचे दादा एकटेच खमके असल्यामुळे त्यांच्या पक्षाकडून ते एकटेच असायचे, असं म्हणत काकडेंनी त्यांची भूमिका मांडली.