
Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखले जातात. एखादी गोष्ट पटली नाही की ते थेट सांगतात. त्यांच्या कामाचा वेग, त्यांच्याकडे असलेल्या खात्याविषयी असलेली असलेली इत्यंभूत माहिती, तोंडपाठ असलेली आकडेवारी यामुळे गडकरी कायम चर्चेत राहणारे केंद्रीय मंत्री आहेत. गडकरी हे असे नेते आहेत, ज्यांच्या प्रत्येक शब्दाला किंमत आहे. दरम्यान, त्यांनी आता नागपुरात बोलताना मोठे विधान केले आहे. त्यांच्या या विधानाचे अनेक अर्थ काढले जातात. माझ्या अनुभवातून लक्षात आलंय की सरकार निकम्मी असते, असं ते भाषणात म्हणाले आहेत.
मला नागपुरात खेळाचे 300 स्टेडियम बनवायचे आहेत. पण माझ्या चार वर्षांच्या अनुभवातून हे लक्षात आलं की सरकार निकम्मी असते. महानगरपालिका, एनआयटी यांच्या भरवशावर काही काम होत नाही. चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं महारथ यांच्याकडे आहे, असं नितीन गडकरी म्हणाले. तसेच, मी राजकारणात आहे. हा फुकट्यांचा बाजार आहे. प्रत्येक गोष्ट फुकटची पाहिजे असते. पण मी फुकटंच देत नाही, असं म्हणत त्यांनी देश तसेच राज्यातल्या राजकारणावर भाष्य केले.
माणूस नशेत असतो तेव्हा विचार करणे बंद करतो. नशा म्हणजे दारू नव्हे तर खेळाची नशा असते, राजकारणाची नशा असते, तर कोणाला ज्ञानाचीही नशा असते. माणूस या नशेत जेव्हा काम करतो तेव्हा तो विचार करायचं बंद करतो. जेव्हा त्याला यश मिळते तेव्हा त्याला त्या यशाची सवय होते, असं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं.
सूत्रसंचालन करताना ज्या व्यक्तीने माझी स्तुती केली ते मला चांगलं वाटलं. पण त्यांनी केलेली स्तुती खरी आहे असे म्हणालो तर माझ्यावर अन्याय असेल आणि खोटं आहे असे मी म्हणालो तर त्याच्यावर अन्याय होईल, असं मिश्किल भाष्यही त्यांनी केलं. सत्ता, संपत्ती आणि सौंदर्य हे नियमित राहणारे नाही. हे सगळं क्षणभंगुर आहे, असंही नितीन गडकरी यांनी आवर्जून सांगितले. अमिताभ बच्चन यांच्यासारखे खूप कमी लोक आहेत. जे सुरुवातीला जेवढे प्रसिद्ध होते, तेवढेच 80 वर्षाचे झाले तरी प्रसिद्ध आहेत, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
आपल्याला 75 ते 80 वर्षापर्यंत चांगले जीवन कसे जगता येईल याची व्यवस्था करून ठेवायला हवी. जेव्हा आपले चांगले दिवस असतात तेव्हा याबद्द्ल आपण विचार करायला हवे. चांगले दिवस असताना समोरून स्तुती करणारे खूप मिळतात. कारण तेव्हा ग्लॅमर असते. म्हणून आपली वेळ संपते तेव्हा कोणी विचार करत नाही, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले.