Maharashtra Cabinet Expansion : ‘या’ महिला आमदारांना मिळू शकली असती मंत्रिपदाची संधी? नेमकं काय बिनसलं?

| Updated on: Aug 09, 2022 | 4:20 PM

Maharashtra Cabinet Expansion : महिलांना संधी का दिली नाही या विरोधकांच्या आरोपावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. विरोधकांचा आक्षेप लवकरच दूर होईल. आमच्या मंत्रिमंडळात महिलांना योग्य ती संधी दिली जाईल.

Maharashtra Cabinet Expansion : या महिला आमदारांना मिळू शकली असती मंत्रिपदाची संधी? नेमकं काय बिनसलं?
'या' महिला आमदारांना मिळू शकली असती मंत्रिपदाची संधी? नेमकं काय बिनसलं?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: अखेर शिंदे सरकारचा विस्तार (cabinet expansion) झाला आहे. या विस्तारात भाजपकडून (bjp) 9 आणि शिंदे गटाकडून 9 आमदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे. हा पहिल्या टप्प्याचा विस्तार असल्याचं सांगितलं जात आहे. राज्याच्या पावसाळी अधिवेशनानंतर पुन्हा एकदा मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येत आहे. मात्र, आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिलेला संधी देण्यात आलेली नाही. 18 पैकी 18 मंत्री हे पुरुषच आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याने विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर (maharashtra government) टीका करत होते. आता मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना स्थान न दिल्याने विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. हे सरकार महिलाविरोधी असल्याची टीका विरोधक करत आहेत. तर पुढच्या विस्तारात महिलांना संधी दिली जाणार असल्याचं सत्ताधाऱ्यांकडून सांगितलं जात आहे. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने महिलांना मंत्रिमंडळात संधी का दिली नाही? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

भाजपकडे एकूण 12 महिला आमदार आहेत. तर शिंदे गटाकडे एकूण तीन महिला आमदार आहेत. मात्र, या पैकी एकाही महिलेला महिलेला मंत्रीपद देण्यात आलेलं नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात देवयानी फरांदे आणि मनिषा चौधरी यांना संधी मिळेल असं सांगितलं जात होतं. पण प्रत्यक्षात कुणालाही संधी देण्यात आली नाही. शिंदे गटानेही एकाही महिलेला संधी दिली नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

संधी नाकारण्याचं कारण काय?

विरोधकांकडून सातत्याने मंत्रीमंडळाच्या विस्तारावर टीका केली जात होती. त्यातच पावसाळी अधिवेशनही घ्यायचं होतं. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना सामोरे जाण्यासाठी मंत्रिमंडळात अनुभवी आणि ज्येष्ठ मंत्र्यांची गरज होती. त्यामुळे महिला आमदारांना तूर्तास संधी दिली नसल्याचं सांगितलं जातं. शिवाय मंत्रीपदासाठी अनेक इच्छुक होते. स्पर्धाही मोठी होती. त्यामुळे भाजपने ठरावीक आणि मातब्बर मंत्र्यांनाच संधी देण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर शिंदे गटानेही आधी माजी मंत्र्यांना संधी देण्याचा निर्णय घेतल्याने महिला आमदारांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकली नसल्याचं सांगितलं जात आहे.

अधिवेशनानंतर संधी

दरम्यान, अधिवेशन झाल्यानंतर महिला आमदारांना संधी दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. तोपर्यंत कोर्टाचाही निर्णय येणार आहे. कोर्टाच्या निर्णयाची टांगती तलवार असल्यानेही महिलांना या मंत्रिमंडळात संधी दिली नसावी, असंही सांगितलं जात आहे.

त्यांना बोलण्याचा अधिकार नाही

दरम्यान, महिलांना संधी का दिली नाही या विरोधकांच्या आरोपावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. विरोधकांचा आक्षेप लवकरच दूर होईल. आमच्या मंत्रिमंडळात महिलांना योग्य ती संधी दिली जाईल. पुढच्या विस्तारात तुम्हाला ते दिसेलच, असं सांगतानाच आघाडी सरकारमध्ये पाच मंत्र्यांनी शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांनी एकाही महिलेला संधी दिली नव्हती. त्यांना बोलण्याचा काहीच अधिकार नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

भाजपकडून मंत्रिपदाच्या दावेदार

1. मंदा म्हात्रे – बेलापूर

2. मनिषा चौधरी – दहिसर

3. विद्या ठाकूर – गोरेगाव

4. भारती लव्हेकर – वर्सोवा

5. माधुरी मिसाळ – पर्वती

6. देवयानी फरांदे – नाशिक मध्य

7. सीमा हिरे – नाशिक पश्चिम

8. श्वेता महाले – चिखली

9. मेघना बोर्डीकर – जिंतूर

10. नमिता मुंदडा – केज

11. मोनिका राजळे – शेवगाव

शिंदे गटातील मंत्रीपदाच्या दावेदार

1. यामिनी जाधव – भायखळा

2. गीता जैन, भाजप बंडखोर – मीरा-भाईंदर

3. मंजुळा गावित – साक्री