Pankaja Munde on Ketaki Chitale : ‘केतकीचं वय पाहता, वॉर्निंग देऊन सोडून द्या’, गोपीनाथरावांच्या राजकारणाचा दाखला देत पंकजा मुंडेंचं आवाहन

| Updated on: May 18, 2022 | 6:49 PM

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शरद पवार आणि सरकारला आवाहन केलं आहे. 'केतकीच्या वयाचा आणि सगळ्या बाबींचा विचार करता एक वॉर्निंग देऊन या सगळ्या गोष्टीला पूर्णविराम दिला पाहिजे', असं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलंय.

Pankaja Munde on Ketaki Chitale : केतकीचं वय पाहता, वॉर्निंग देऊन सोडून द्या, गोपीनाथरावांच्या राजकारणाचा दाखला देत पंकजा मुंडेंचं आवाहन
पंकजा मुंडे, केतकी चितळे
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेवर राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तीन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आता तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. केतकी चितळेने (Ketaki Chitale) जामिनासाठी अर्जही सादर केलाय. मात्र, आता गोरेगाव पोलीस तिचा ताबा घेण्याची शक्यता आहे. तसंच इतर ठिकाणच्या पोलिसांकडूनही तिची कोठडी मागितली जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी शरद पवार आणि सरकारला आवाहन केलं आहे. ‘केतकीच्या वयाचा आणि सगळ्या बाबींचा विचार करता एक वॉर्निंग देऊन या सगळ्या गोष्टीला पूर्णविराम दिला पाहिजे’, असं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलंय.

‘या सगळ्या गोष्टीला पूर्णविराम दिला पाहिजे’

पंकजा मुंडे म्हणाल्या की, एखाद्याने सोशल मीडियाचा वापर कसा करावा, हा जरी व्यक्ति स्वातंत्र्याचा भाग असला तरी सर्वांचा सन्मान ठेवणं गरजेचं. टीका सुद्धा अशी करावी ज्यात कुठेही बीभत्सपणा नसावा. तो बीभत्सपणा त्या टीकेमध्ये आढळला. त्याच्याबद्दल निंदा व्यक्त करते. पण आम्ही लहानपाणापासून राजकारण जवळून पाहिलंय. तेव्हा सोशल मीडिया नव्हता, पण लोकं पेपरमधून लिहित होते. बऱ्याचदा भाषा घसरायची, हे आम्ही लहानपणापासून पाहिलंय. त्यावेळी आम्ही मुंडे साहेबांना विचारायचो की हे असं लिहिलेलं तुम्ही सहन कसं करता. त्यावर ते म्हणायचे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांची व्याख्या जरा वेगळ्या पदधतीने घेतली जाते आहे. पण मला असं वाटतं की तिच्या वयाचा आणि सगळ्या बाबींचा विचार करता एक वॉर्निंग देऊन या सगळ्या गोष्टीला पूर्णविराम दिला पाहिजे. पवारसाहेब खूप मोठे नेते आहेत, असंही पकंजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

केतकी चितळेची आजची रात्रही ठाणे कारागृहात

तीन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आज ठाणे कोर्टानं केतकी चितळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर तिने जामीनासाठी अर्ज केला. मात्र, तिच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होऊ शकली नाही. दुसरीकडे ठाणे सत्र न्यायालयात सुनावणीवेळी गोरेगाव पोलीस तिचा ताबा घेण्यासाठी पोहोचले होते. त्यांनी केतकीच्या कोठडीची मागणी केली असता, न्यायालयाकडून केतकीची कोठडी गोरेगाव पोलिसांकडे देण्यात आलीय. मात्र, वेळेअभावी केतकीचा ताबा गोरेगाव पोलिसांकडेही देण्यात आला नाही. त्यामुळे केतकीची आजची रात्रही ठाणे कारागृहात जाणार आहे.

हे सुद्धा वाचा