विधानसभेपूर्वी काँग्रेसला रामराम, अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत बड्या नेत्याची पक्षात घरवापसी

| Updated on: Oct 30, 2020 | 5:46 PM

काँग्रेसचे माजी आमदार कुंडलिकराव नागरे यांचे चिरंजीव सुरेश नागरेंनी विधानसभा निवडणुकांपूर्वी पक्ष सोडला होता

विधानसभेपूर्वी काँग्रेसला रामराम, अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत बड्या नेत्याची पक्षात घरवापसी
Follow us on

परभणी : विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकणारे परभणीतील बडे नेते सुरेश नागरे यांनी पक्षात घरवापसी केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. काँग्रेस कमिटीच्या बैठकीसाठी अशोक चव्हाण परभणीत होते. (Parabhani Leader Suresh Nagare joins Congress in presence of Ashok Chavan)

परभणी शहरातील एमआयडीसी भागातील व्यंकटेश मंगल कार्यालयात बैठक झाली. जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसींच्या पदाधिकाऱ्यांना अशोक चव्हाणांच्या हस्ते नियुक्त पत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी सुरेश नागरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

“दिल्लीतील नेते शिवसेनेसोबत आघाडी करण्यास अनुकूल नव्हते. शिवसेनेबरोबर जायचं नाही, याबाबत संभ्रम होता, पण भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेबरोबर आघाडी करावी, असं राज्यातील नेत्यांचं मत होतं. कारण भाजपने काँग्रेस पक्षाला संपवण्याचं काम सुरु केलं होतं. म्हणून भाजपला रोखण्यासाठी आपण शिवसेनेबरोबर गेलो, असं अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.

“सत्तेत असताना आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे, या मताचा मी आहे. पण दुर्दैवाने कोरोनामुळे 30 टक्केच निधी मिळाला, पण मराठवाड्याला अधिकचा निधी देण्याची माझी भूमिका आहे” अशी ग्वाही यावेळी चव्हाणांनी दिली.

कोण आहेत सुरेश नागरे?

सुरेश नागरे हे काँग्रेसचे माजी आमदार कुंडलिकराव नागरे यांचे चिरंजीव आहेत. विधानसभा निवडणुकांपूर्वी सुरेश नागरेंनी काँग्रेस पक्ष सोडला होता. ते परभणी विधानसभेसाठी काँग्रेसकडे तिकीट मागत होते, परंतु स्थानिक नेत्यांनी विरोध केल्याने त्यांना तिकिट मिळालं नाही. अखेर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली.

काँग्रेसचे रविराज देशमुख आणि शिवसेनेच्या राहुल पाटील यांनी सुरेश नागरे यांना टफ फाईट दिली. त्यामुळे नागरेंना पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

कुंडलिकराव नागरेंचा वारसा

कुंडलिकराव भगवानराव नागरे यांचे 4 मार्च 2018 रोजी वयाच्या 66 व्या वर्षी मुंबईत निधन झाले. ते परभणीतील जिंतूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार आणि परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तत्कालीन अध्यक्ष होते. (Parabhani Leader Suresh Nagare joins Congress in presence of Ashok Chavan)

सावळी बु. (ता.जिंतूर) येथील मूळ रहिवाशी असलेल्या नागरे यांनी 1999 ते 2004 या कालावधीत जिंतूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. आमदार असताना ते औरंगाबाद विभागीय म्हाडाचे सभापती होते. त्यांनी म्हाडाची घरकुल योजना ग्रामीण भागात राबवली. त्यांच्या प्रयत्नातून जिंतूर येते दूध शीतकरण केंद्र सुरु करण्यात आले.

संबंधित बातम्या :

दिल्लीतील नेते शिवसेनेसोबत जाण्यास अनुकूल नव्हते: अशोक चव्हाण

धुळ्यात राष्ट्रवादीत इनकमिंग सुरु, अनिल गोटेंच्या नेतृत्वात नेत्याचा पक्षप्रवेश

(Parabhani Leader Suresh Nagare joins Congress in presence of Ashok Chavan)