
चंदन पुजाधिकारी, नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांची तयारी सुरू झाली आहे .यंदाच्या निवडणुकीत एकूणच राम मंदिर (Ram Mandir) फीवर बघता नाशिकच्या राजकीय आखाड्यात साधू महंतांनी उडी घेतली आहे. त्यामुळे प्रस्थापित कार्यकर्त्यांना बाजूला सारून सर्वपक्षीय साधू महंतांना उमेदवारी देणार का याची चर्चा सध्या सुरू आहे. आयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिराच्या भव्य दिव्य सोहळ्यानंतर राजकीय पटलावर आता साधू महंतांचा वावर वाढला आहे. नाशिक लोकसभा मतदार संघासाठी तब्बल तीन ते चार साधू महंतांनी तयारी सुरू केली आहे.
उत्तर महाराष्ट्र सह मराठवाड्यात मोठा भक्त परिवार असलेल्या शांतिगिरी महाराज यांनी नाशिक किंवा छत्रपती संभाजी नगरमधून उमेदवारी करण्याची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे त्रंबकेश्वर स्थित स्वामी श्री कंठानंद यांनी देखील आपण निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याचं जाहीर केलं आहे. नाशिकच्या आध्यात्मिक क्षेत्रात मोठ नाव असलेले महंत अनिकेत शास्त्री महाराज देखील निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी करत आहेत.