देवेंद्र फडणवीस यांच्याकडून क्लीनचिट; प्रकाश आंबेडकर यांचं फडणवीस यांना आव्हान काय?

विधानसभेत अबू आझमी यांनी औरंगजेबाचा मुद्दा उपस्थित केला होता. औरंगजेबाचा स्टेट्स ठेवला म्हणून गुन्हे दाखल होतात. मग प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुले वाहून आले.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून क्लीनचिट; प्रकाश आंबेडकर यांचं फडणवीस यांना आव्हान काय?
prakash ambedkar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 04, 2023 | 8:09 AM

मुंबई | 4 जुलै 2023 : औरंगजेबाच्या कबरीवर वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी फूल वाहिले होते. या प्रकरणाचे विधानसभेत पडसाद उमटले. त्यावरून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश आंबेडकर यांना क्लीनचिट दिली. औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहणे गुन्हा नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. मात्र, फडणवीस यांचं हे उत्तर प्रकाश आंबेडकर यांना पटलेलं नाही. फडणवीस हे गोलमाल उत्तर देत असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे

प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. राज्याच्या विधानसभेमध्ये औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहणे आणि पोस्ट ठेवणे यासंदर्भात मुद्दा उपस्थित करून चर्चा करण्यात आली. अबू आजमी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे उत्तर दिलं ते गोलमाल उत्तर आहे, असा माझा आरोप आहे. देशात कुणाच्याही मजारीवर, कबरीवर जाण्यास बंदी आहे का? याचा खुलासा फडणवीस यांनी केला पाहिजे. कुणाचं काय मत आहे हा वेगळा भाग आहे. पण कायद्याने बंदी असेल तर ते सांगावं आणि कायद्याने बंदी नसेल तर त्याचाही त्यांनी खुलासा करावा, असं आव्हानच प्रकाश आंबेडकर यांनी दिलं आहे.

मिलीभगत आहे काय?

फडणवीस आणि अबू आझमी यांची मिलीभगत आहे. मजार किंवा कबरीवर जाऊ नये असा कायदा आहे काय? माझ्या माहितीप्रमाणे असा कायदा नाही. त्यामुळे कुणीही मजारवर जाऊ शकतो. कुणाचाही स्टेट्स ठेवू शकतो. आता राजकारणासाठी कुणी काय करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, अशी टीकाच आंबेडकर यांनी केली आहे.

सत्तेत राहण्यासाठी फूट पाडण्याचा प्रयत्न

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली आहे. द्वेष, जातिवाद आणि मृत्यूच्या व्यापाराचा ठेकेदार आणि त्याचे गुंड निवडणुकीतील फायदा मिळवण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी दंगली भडकावण्यावर, ध्रुवीकरण करण्यासाठी धार्मिक आणि जातीय फूट वाढवण्यावर विश्वास ठेवतात. भाजप – आरएसएस सतत सत्तेत राहावी यासाठी दलित, आदिवासी, ओबीसी आणि मुस्लिमांना सतत दडपण, भीती आणि दहशतीच्या छायेखाली ठेवण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.

 

फडणवीस काय म्हणाले होते?

विधानसभेत अबू आझमी यांनी औरंगजेबाचा मुद्दा उपस्थित केला होता. औरंगजेबाचा स्टेट्स ठेवला म्हणून गुन्हे दाखल होतात. मग प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुले वाहून आले. त्यांच्यावर कारवाई का होत नाही? या देशात दोन कायदे आहेत काय? असा सवाल अबू आझमी यांनी केला होता. त्यावर कुणाच्याही कबरीवर जाऊन फुले वाहणे हा गुन्हा नाही. फक्त चुकीच्या लोकांचं महिमामंडन करता कामा नये, असं सांगतानाच औरंगजेब हा कुणाचाही हिरो होऊ शकत नाही. मुस्लिमांचाही हिरो होऊ शकत नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं.