ठाकरे गट, काँग्रेससोबतच्या युतीवर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला युतीची ऑफर दिल्याची माहिती समोर येत आहे.

ठाकरे गट, काँग्रेससोबतच्या युतीवर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
| Updated on: Oct 15, 2022 | 3:11 PM

मुंबई : राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला युतीची ऑफर दिल्याची माहिती समोर येत आहे. वंचितची ठाकरे आणि काँग्रेससोबत (Congress) युती करण्याची तयारी आहे, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाला युतीची अप्रत्यक्ष ऑफर दिल्याची चर्चा आहे.

नेमकं काय म्हणाले आंबेडकर?

प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसला युतीची ऑफर दिली आहे. वंचित बहुजन आघाडीची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेससोबत युती करण्याची तयारी आहे. मात्र वंचितच्या युतीच्या भूमिकेवर ठाकरे गट आणि काँग्रेसकडून प्रतिसाद आलेला नाही. ठाकरे गट किंवा काँग्रेसकडून प्रतिसाद आल्यास युतीबाबत विचार करू असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

भाजप, शिंदे गट युतीवर प्रतिक्रिया

दरम्यान दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी शिंदे गट आणि भाजपाच्या युतीबाबत देखील मोठं वक्तव्य केलं आहे. जसे भाजपाला उद्धव ठाकरे नको होते तसेच आता एकनाथ शिंदे देखील नको आहेत. परिस्थिती अनुकूल राहिली तरच भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेंसोबत युती करेल. त्यामुळे आता आगामी महापालिका, नगर पालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजप शिंदे गटासोबत युती करणार का? हे पहावे लागेल असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

लोकशाहीत मतदार राजा

यावेळी बोलताना राज्यात सध्या सुरू असलेल्या परिस्थितीवरून देखील त्यांनी सर्वच पक्षांवर जोरदार निशाणा साधला आहे.  राज्यात ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे ते योग्य नाही. लोकशाहीमध्ये मतदार हा राजा असतो. तोच ठरवेल कोणाला सत्तेत बसवायचं असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.