IND vs SA : टीम इंडियाला धर्मशालेत मालिकेत आघाडी घेण्याची संधी, दक्षिण आफ्रिका रोखणार?
India vs South Africa 3rd T20i Preview : दक्षिण आफ्रिकेने 2-0 ने कसोटी मालिका जिंकली. तर टीम इंडियाने 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-1 ने नावावर केली. त्यानंतर आता टी 20i सीरिज कोण जिंकणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. उभयसंघातील मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा सामना हा निर्णायक ठरणार आहे. तिसरा सामना जिंकून दोन्ही संघांना मालिकेत आघाडी घेण्याची संधी आहे. मात्र दोघांपैकी कोणता तरी 1 संघ जिंकणार असल्याचं स्पष्ट आहे. त्यामुळे तिसरा सामना हा चुरशीचा होणार आहे. तिसरा सामना हा रविवारी 14 डिसेंबरला धर्मशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या कामगिरीकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडियाने आघाडी घेण्याची संधी गमावली
टीम इंडियाने 9 डिसेंबरला मालिकेत विजयी सुरुवात केली होती. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 100 पेक्षा अधिक धावांनी मात करत विजयी सलामी दिली. हार्दिक पंड्या याने भारताच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. त्यामुळे टीम इंडियाला 11 डिसेंबरला झालेल्या दुसऱ्या टी 20i सामन्यात विजय मिळवून मालिकेत 2-0 ने एकतर्फी आघाडी घेण्याची संधी होती. मात्र दुसऱ्या सामन्यात अपवाद वगळता टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमधील बहुतांश खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेसमोर गुडघे टेकले.
टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याने या सामन्यात टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. दक्षिण आफ्रिकेने या संधीचा दोन्ही हाताने फायदा घेतला. ओपनर क्विंटन डी कॉक याने 90 धावांची खेळी केली. तर अखेरच्या आणि निर्णायक क्षणी डोनोवेन फरेरा 30 आणि डेव्हिड मिलर 20 धावा केल्या. कॅप्टन एडन मार्रक्रम 29 आणि डेवाल्ड ब्रेव्हीस याने 14 धावांचं योगदान दिलं. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे 20 ओव्हरमध्ये 213 धावा केल्या.
टीम इंडियाला 214 धावांच्या प्रत्युत्तरात 19.1 ओव्हरमध्ये ऑलआऊट 162 रन्सच करता आल्या. तिलक वर्मा याच्या 62 धावांचा अपवाद वगळता टीम इंडियाच्या एकालाही मोठी खेळी साकारता आली नाही. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे हा सामना जिंकला आणि पहिल्या पराभवाची परतफेड केली.
तिसरा सामना कोण जिंकणार?
आता दक्षिण आफ्रिकेचा सलग दुसरा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न असणार आहे. तर टीम इंडियाकडे तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून दुसऱ्या मॅचमधील पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. आता यात कोण यशस्वी ठरणार? हे सामन्याच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.
तसेच दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर तिसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल होणं अपेक्षित आहेत. आता प्लेइंग ईलेव्हनमधून कुणाचा पत्ता केला जाणार? हे टॉसनंतरच स्पष्ट होईल.
