Jasprit Bumrah च्या बॉलिंगची धार कमी, 10 सामन्यांमध्येच 5 वर्षांची बरोबरी, आकडेच सांगतात सर्वकाही
जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा टॉपचा बॉलर आहे. जसप्रीत नुकताच टेस्ट, वनडे आणि टी 20i या तिन्ही फॉर्मटमध्ये 100 विके्टस घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. मात्र आता बुमराहच्या बॉलिंगची धार कमी झाल्याचं आकडेवारीवरुन सिद्ध होत आहे. जाणून घ्या.

जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा प्रमुख आणि अनुभवी वेगवान गोलंदाज आहे. बुमराहने आतापर्यंत गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने टीम इंडियासाठी तिन्ही फॉर्मेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. बुमराहने असंख्य सामन्यात आपल्या धारदार बॉलिंगच्या जोरावर अशक्य वाटणारे सामने जिंकून दिलेत. धावा किती कमी असल्या तरीही बुमराह बचाव करुन भारताला विजयी करणार, हा विश्वास या युवा गोलंदाजाने संपादन केला आहे. मात्र बुमराहसाठी 2025 हे वर्ष काही खास राहिलेलं नाही, असं आम्ही नाही तर बुमराहची आकडेवारीवरुन हे स्पष्ट होतं.
टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी 20i सामन्यात 51 धावांनी पराभूत व्हावं लागलं. या सामन्यात टीम इंडियाकडून अपवाद वगळता सर्वांनीच निराशाजनक कामगिरी केली. जसप्रीत बुमराह याने या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 45 धावा लुटवल्या. बुमराहसारख्या गोलंदाजाला या सामन्यात एकही विकेट घेता आली नाही. तसेच दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी बुमराहच्या बॉलिंगवर सिक्स लगावले. बुमराहने यासह गेल्या 5 वर्षांची बरोबरी या 2025 एका वर्षात केली आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी बुमराहच्या बॉलिंगवर एकूण 4 सिक्स खेचले. बुमराहसोबत टी 20i कारकीर्दीत असं पहिल्यांदाच झालं. बुमराहने 2025 या वर्षात आतापर्यतं 10 टी 20i सामने खेळले आहेत. या 10 सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजांनी बुमराहला 2025 वर्षात 10 षटकार लगावले आहेत. गोलंदाजांची धुलाई होणं स्वभाविक आहे. मात्र हे आकडे बुमराहच्या लौकीकाला शोभा देणारे नाहीत. तसेच बुमराहने 2020 ते 2024 दरम्यान 27 डावात 100 ओव्हर बॉलिंग केली. या दरम्यान बुमराहच्या बॉलिंगवर प्रतिस्पर्धी संघांना फक्त 12 षटकार लगावता आले होते. त्या तुलनेत बुमराहची 2025 मधील आकडेवारी सर्व काही सांगून जाते.
बुमराहवर टांगती तलवार
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20i मालिकेतील 3 सामने बाकी आहेत. त्यामुळे उर्वरित सामन्यांमध्ये बुमराहची धुलाईची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बुमराह 12 षटकारांच्या विक्रमाची बरोबरी करेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
तसेच बुमराहवर 9 वर्षांनंतर पुन्हा एकदा तशी वेळ ओढावू शकते. बुमराहने 2016 साली आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. बुमराह 2016 या वर्षात 21 टी 20i सामने खेळला. बुमराहच्या बॉलिंगवर 2016 प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजांनी 15 षटकार लगावले होते. त्यानंतर बुमराहने एका वर्षात 4 पेक्षा अधिक षटकार लगावता आले नव्हते. मात्र आता बुमराहने 2025 वर्षात आधीच टी 20i क्रिकेटमध्ये 10 सिक्स खाल्ले आहेत. त्यामुळे आता उर्वरित 3 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी बुमराहच्या बॉलिंगवर 5 सिक्स लगावल्यास गोलंदाजाला 9 वर्षांनंतर पुन्हा नको तसा दिवस पाहावा लागेल.
