‘यांची’ लहर आणि झटका म्हणजेच नियम आणि कायदा! – दरेकर

| Updated on: Dec 22, 2020 | 1:58 PM

अनलॉकिंगला सुरुवात केल्यानंतर हॉटेल, मंदिरं, मंडई यांना परवानगी दिली होती. मग आता निर्बंध का लावले जात आहेत? असा प्रश्न प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

यांची लहर आणि झटका म्हणजेच नियम आणि कायदा! - दरेकर
प्रवीण दरेकर आणि उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई: UK मधील कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर आणि नाताळ, नववर्षाच्या सेलिब्रेशनला होणारी गर्दी लक्षात घेता राज्य सरकारनं रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. त्यावरुन आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘महाविकास आघाडी सरकार भांबावलेलं आहे. यांना आलेली लहर आणि झटका म्हणजेच नियम आणि कायदा होतो!’, अशा शब्दात दरेकर यांनी ठाकरे सरकारला टोला हाणलाय. (Praveen darekar criticize state government on night curfew)

यापूर्वी अनलॉकिंगला सुरुवात केल्यानंतर हॉटेल, मंदिरं, मंडई यांना परवानगी दिली होती. मग आता निर्बंध का लावले जात आहेत? असा प्रश्न दरेकांनी विचारलाय. ब्रिटिश एअरवेजच्या सर्व विमानफेऱ्यांवर आपण बंदी आणली आहे. कोरोना संकटासोबतच राज्यावर आणि सर्वसामान्य जनतेवर आर्थिक संकट ओढावलं आहे. त्यात इथला माणूस पिचला गेलाय. त्याला अजून संकटात टाकू नका, असं आवाहन दरेकर यांनी राज्य सरकारला केलंय.

सर्वसामान्य माणसाला नाउमेद करु नका. कोरोनापेक्षा तो उपासमारीने मरेल. छोट्या-मोठ्या व्यावसायीकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे. पण दुर्दैवानं ते होताना दिसत नसल्याचं खंतही दरेकरांनी व्यक्त केलीय.

‘कृषी कायदा हिताचाच, विरोधकांची नौटंकी’

कृषी कायद्यावरुन विरोधकांची नौटंकी सुरु आहे. कृषी कायदा हा शेतकरी हिताचाच आहे आणि तो कुठल्याही व्यासपीठावर सांगण्याची आमची तयारी असल्याचा दावा दरेकर यांनी केलाय. APMC हे तुमचे अड्डे आहेत. शेतकऱ्यांनी तिथेच माल विकावा आणि सेस भरावा, अशी तुमची भूमिका आहे. सत्ताधारी शेतकऱ्यांना लाचाराप्रमाणे वागवत असल्याचा घणाघातही दरेकरांनी केलाय. बच्चू कडू वा अजित नवले यांच्या आंदोलनात शेतकरी दिसत आहेत का? असा सवालही त्यांनी केलाय.

हॉटेल व्यवसायिक, व्यापाऱ्यांचाही विरोध

राज्य सरकारच्या रात्रीच्या संचारबंदीच्या निर्णयाला हॉटेल व्यावयसायिकांनंतर व्यापाऱ्यांनी देखील विरोध केला आहे. आहार संघटनेनंतर फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेयर असोसिएशनने मुंबईतील नाई कर्फ्यूला विरोध केला आहे. कोरोना विषाणूसोबत राज्य सरकारने व्यापाऱ्यांच्याही हिताचा विचार करावा, अशी मागणी एफआरटीडब्ल्यूओचे अध्यक्ष विरेन शाह यांनी केलीय.

बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आंदोलन

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आज मुंबईत रिलायन्स कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकरही सहभाही होणार आहेत. तत्पूर्वी सकाळी बच्चू कडू यांना नागपूरच्या विश्रामगृहावरच पोलिसांकडून रोखण्यात आलं होतं. त्यानंतर कडू यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना फोन करुन माहिती दिली. अखेर पोलिसांना आदेश मिळाल्यानंतर त्यांनी बच्चू कडूंना मुंबईला जाण्यास परवानगी दिली. दुपारी साडे बाराच्या विमानाने ते मुंबईसाठी रवाना झाले.

संबंधित बातम्या:

नाईट कर्फ्युमुळे हॉटेल व्यावसायिक नाराज? शरद पवारांच्या भेटीला जाण्याची शक्यता

Maharashtra Night Curfew: महाराष्ट्रात आजपासून नाईट कर्फ्यू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

Praveen darekar criticize state government on night curfew