Who is Dhangekar? चंद्रकांत पाटलांचा सवाल, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस, पुण्यात धडाकेबाज बॅनरबाजी

रवींद्र धंगेकर राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीला शिवसेनेत होते. त्यामुळे आजच्या विजयानंतर त्यांचा बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा एक फोटोही व्हायरल होतोय.

Who is Dhangekar? चंद्रकांत पाटलांचा सवाल, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस, पुण्यात धडाकेबाज बॅनरबाजी
Image Credit source: social media
| Updated on: Mar 02, 2023 | 4:41 PM

पुणे : ‘पुण्यातील कसबा पेठेची निवडणूक ही रासने विरुद्ध धंगेकर अशी आहे म्हणतात. पण Who is Dhangekar?’ असा सवाल करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना आज नेटकऱ्यांकडून जोरदार उत्तर मिळतंय. भाजप नेते आणि पुण्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांचा व्हिडिओ आणि धंगेकरांनी आजवर काय काय करून दाखवलं, त्याचं कौतुक सांगणारी भाषणं, वाक्य, घोषणा, कविता, गाणी यांचा वर्षावच होतोय. धंगेकर नेमके कोण आहेत, असा प्रश्न विचारून नव-नवीन गाणी सादर केली जात आहेत. जो पत्ता करतो गुल.. पावरफुल्ल… हे गाणंही सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय. पुण्यात जागोजागी तशी बॅनरबाजीही केली जातेय.

‘४४० चा करंट द्या…’

कसब्यात हेमंत रासनेंना विजयी करा. कमळाचं बटन दावा आणि अजित पवारांना ४४० चा करंट द्या, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं. त्यावरूनही भाजपला सोशल मीडियावर सुनावण्यात आलंय.सोशल मीडियावर पुढील कविता, गाणी शेअर करण्यात आली आहेत.

पब्लिक की डिमांड थी…
तो भाऊ को आना पडा..
साऱ्या पुन्यात इतिहास घडला
पायरी यशाची एक एक चढला
विरोधकांचा धुरळा उडला
बघा कार्याचा प्रकाश पडला
आला आला आला रवींद्र धंगेकर आला…

कार्यकर्त्यांचा जल्लोष

रवींद्र धंगेकर यांच्या विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात हा विजय साजरा केला. गुलाल आणि पुष्पांची उधळण करत कसबा पेठेत धंगेकरांची मिरवणूक काढण्यात आली. रवींद्र धंगेकर सध्या काँग्रेसमध्ये असले तरीही आधी १० वर्षे शिवसेना, त्यानंतर मनसे आणि काँग्रेस असा त्यांचा राजकीय प्रवास झाला आहे. पाच वर्षे ते नगरसेवक राहिले आहेत. त्यामुळे सामान्यांचे नेते अशी त्यांची ओळख आहे. गरजेच्या वेळेला कुणाच्याही मदतीला धावून जाणारे नगरसेवक अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळेच भाजपच्या हेमंत रासने यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना तिकिट दिलं आणि आज ते मोठ्या फरकाने विजयी झाले.

‘बाळासाहेब ठाकरेंसोबतचा फोटो व्हायरल’

रवींद्र धंगेकर राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीला शिवसेनेत होते. त्यामुळे आजच्या विजयानंतर त्यांचा बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा एक फोटोही व्हायरल होतोय.