पराभव का झाला? कारणं शोधण्यासाठी राहुल गांधी अमेठीला जाणार

| Updated on: Jul 08, 2019 | 7:52 PM

अमेठी हा गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय. पण हा पराभव काँग्रेससह राहुल गांधींच्याही जिव्हारी लागणारा होता. कारण, सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मतदारसंघात चक्क पक्षाच्या अध्यक्षालाच पराभव स्वीकारावा लागला होता.

पराभव का झाला? कारणं शोधण्यासाठी राहुल गांधी अमेठीला जाणार
Follow us on

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत काँग्रेससाठी सर्वात धक्कादायक निकाल होता तो म्हणजे अमेठीचा. काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांचा या मतदारसंघातून पराभव झाला. या पराभवाची कारणं शोधण्यासाठी राहुल गांधी 10 जुलैला अमेठीत जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. अमेठी हा गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय. पण हा पराभव काँग्रेससह राहुल गांधींच्याही जिव्हारी लागणारा होता. कारण, सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मतदारसंघात चक्क पक्षाच्या अध्यक्षालाच पराभव स्वीकारावा लागला होता.

सूत्रांच्या माहितीनुसार, या एकदिवसीय दौऱ्यात राहुल गांधी मतदारसंघातल्या लोकांशीही चर्चा करतील. अमेठीमध्ये भाजपच्या उमेदवार आणि विद्यमान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी विजय मिळवला होता. राहुल गांधींनी यावेळी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, ज्यात त्यांनी केरळमधील वायनाडमधून विजय मिळवला.

काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीतील खराब कामगिरीनंतर राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. सध्या ते पक्षाच्या कामासाठी विविध दौरे करत आहेत. पक्ष बांधणी करण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात, असं राहुल गांधींनी राजीनामा देताना म्हटलं होतं. काँग्रेसकडून आता नवा पक्षाध्यक्ष निवडला जाणार आहे.

राहुल गांधींनी नुकतीच राजीनाम्याची अधिकृत घोषणा केली होती. पण पक्षाने अधिकृतपणे त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. विशेष म्हणजे 10 जुलैलाच काँग्रेसच्या कार्यकारिणीचीही बैठक होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये राहुल गांधींचा राजीनामा स्वीकारण्याबाबत निर्णय होईल. नवा अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेणार नसल्याचं राहुल गांधींनी अगोदरच स्पष्ट केलंय.

संबंधित बातम्या :

अखेर अध्यक्षपदावरुन पायउतार, राहुल गांधींचं 4 पानी पत्र जसंच्या तसं

अध्यक्षपदाचा राजीनामा, आर्टिकल 15 पाहण्यासाठी राहुल गांधी थिएटरमध्ये