आदित्य निवडणूक लढण्यात गैर काय? अमितलाही रोखणार नाही : राज ठाकरे

उद्या माझ्या मुलाला निवडणुकीत उतरायचं असेल, आणि तो याबाबत ठाम असेल, तर मी नाही म्हणणार नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी अमित ठाकरेंनाही हिरवा कंदील दिला.

आदित्य निवडणूक लढण्यात गैर काय? अमितलाही रोखणार नाही : राज ठाकरे

मुंबई : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या निवडणूक लढण्यावर काका आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. आदित्य ठाकरे असो किंवा पुत्र अमित ठाकरे, त्यांना निवडणूक लढवावीशी वाटत असेल, तर त्यात गैर काय? असं म्हणत राज ठाकरेंनी (Raj Thackeray on Aditya Thackeray) पाठिंबा दिला.

निवडणूक लढवावी की नाही, हे प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे. उद्या माझ्या मुलाला निवडणुकीत उतरायचं असेल, आणि तो याबाबत ठाम असेल, तर मी नाही म्हणणार नाही. पण त्याला स्वतःविषयी खात्री वाटत नसेल तर कोण काय करु शकेल? असं राज ठाकरे म्हणाले. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे बोलत होते.

‘बाळासाहेब आधीपासूनच व्यंगचित्रकार होते. माझे आजोबा म्हणाले होते, की याला जे जे स्कूल ऑफ आर्ट्सला पाठवू नका, याचा हात खराब होईल. जेव्हा उद्धव किंवा मी जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये जायचं म्हटलं, तेव्हा त्यांनी नकार नाही दिला. त्यांनी आपली मतं आमच्यावर लादण्याचा कधी प्रयत्न नाही केला.’ हे उदाहरण देत आपल्या पुढच्या पिढीला निवडणूक लढण्याबाबत निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असल्याचं राज ठाकरे (Raj Thackeray on Aditya Thackeray) यांनी सांगितलं.

जर आमच्या मुलांना निवडणूक लढवावी असं वाटत असेल, तर आम्ही त्यांना मागे खेचणार नाही. त्यामुळे आदित्यला निवडणूक लढवायची असेल, तर त्यात चूक काय? असं राज ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तिथे आघाडीने उमेदवार दिला असला, तरी मनसेने विरोधात उमेदवार उभा केलेला नाही. ‘हे एक चांगलं कृत्य (जेश्चर) आहे. तो निवडणूक लढवत असेल, तर त्याच्याविरोधात उमेदवार देता कामा नये, असं मला वाटतं, त्यांना काय वाटतं, हा वेगळा मुद्दा आहे, असंही राज ठाकरे म्हणतात.

आदित्य ठाकरेंविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे घटनातज्ञ अॅड. सुरेश माने हे उमेदवार आहेत. खरं तर, सुप्रिया सुळे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या, त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी विरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. याची जाण ठेवत आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देण्यास शरद पवार सकारात्मक नव्हते. मात्र लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांचा पराभव करणारा शिवसेनेचा उमेदवार असल्यामुळे अजित पवार हे काकांच्या निर्णयावर समाधानी नसल्याचं म्हटलं जात होतं.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI