Raju Patil Letter : ‘राजकारण बाजूला ठेवून ‘मृत्यूकारण’ तपासून पाहा’, पाणीटंचाईवरुन राजू पाटलांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा

| Updated on: May 10, 2022 | 11:49 PM

राजकारण बाजूला ठेवून 'मृत्यूकारण' तपासून पाहा. आमच्या जीवावर उठलेला आयुक्त नको, असं म्हणत राजू पाटील यांनी आयुक्तांच्या बदलीची मागणीही केली आहे. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून पत्र लिहितोय, असं सांगत पाटील यांनी शिंदेंकडून आश्वासनाची नाही तर कृतीची अपेक्षा असल्याचं म्हटलंय.

Raju Patil Letter : राजकारण बाजूला ठेवून मृत्यूकारण तपासून पाहा, पाणीटंचाईवरुन राजू पाटलांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा
पाणीटंचाईवरुन राजू पाटील यांचं एकनाथ शिंदेंना पत्र
Image Credit source: TV9
Follow us on

ठाणे : कल्याण ग्रामीणमधील 27 गावांच्या पाणीटंचाईमुळे (Water scarcity) 5 जणांचा जीव गेलाय. त्या पार्श्वभूमीवर मनसेचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील (Raju Patil) यांनी नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिलं आहे. ‘तुम्ही सध्या वाहिन्यांवर दिसता, पण चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने. तुम्हाला कदाचित ही दुर्दैवी घटना माहिती नसेल, म्हणून हा पत्रप्रपंच’ म्हणत राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर खोचक टीका केलीय. राजकारण बाजूला ठेवून ‘मृत्यूकारण’ तपासून पाहा. आमच्या जीवावर उठलेला आयुक्त नको, असं म्हणत राजू पाटील यांनी आयुक्तांच्या बदलीची मागणीही केली आहे. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून पत्र लिहितोय, असं सांगत पाटील यांनी शिंदेंकडून आश्वासनाची नाही तर कृतीची अपेक्षा असल्याचं म्हटलंय.

राजू पाटील यांचं पत्र जसच्या तसं

सप्रेम नमस्कार आणि एक विशेष विनंती… पत्रास कारण की… जीव गेलाय… पाच निष्पापांचा, पाणीटंचाई’ मुळे।

देसलेपाड्यातल्या नळांना पाणी नाही म्हणून दुसऱ्या गावच्या खदानीवर कपडे धुवायला गेलेल्या आपल्या नातवंड, सून आणि पत्नीचा चेहरा पोलीस पाटलांनी पहिला तो शेवटचा. तुम्ही सध्या वाहिन्यांवर दिसता पण चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने, तुम्हाला कदाचित ही दुर्दैवी घटना माहित नसेल म्हणून हा प्रपंच

पाण्यासाठी वणवण, तहानेने कासावीस होणे, हे सगळं एव्हाना सवयीचे होऊन गेलंय. पण आता पुढची पायरी गाठली गेली हो. पाण्यामुळे मृत्यु झालाय. एक दोपांचा नाही तर 5 निष्पाप जीवांचा.

तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, ‘पाण्यापायी जीव गेला’ हे ऐकून तुमचे डोळे नक्कीच पाणावले असतील. आता त्याच डोळ्यातून थोडं वास्तवाकडे पहा. या सगळ्याला जबाबदार कोण? पाणी द्या, पाणी द्या सांगून 27 गाव गेली अनेक वर्ष उर बडवतायत. पण तुम्ही ज्यांना आयुक्त म्हणून नेमलेय त्यांच्या कानाशी तो आवाज पोहोचतच नाहीय. वारंवार वृत्तपत्रातून आणि माध्यमातून ‘पाणीबाणी जाहीर होत असते, पण बहुतेक आपण नेमलेले (की निर्वावलेले) आयुक्त त्या बातम्यांना केराची टोपलीच दाखवतात. आमच्या नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणायचे आणि तेच पाणी पिऊन जगा असे सांगायचं. तहान भागवण्यासाठी आयुक्तांनी केलेली योजना तर नाही ना हो ?

आता तर रडून भेकून डोळेही कोरडे पडले, आता काय? अजून काही मृत्यु व्हायची वाट पाहायची का? म्हणजे आणखी डोळ्यातून पाणी येईल हो, पण नळाला येणार नाही.

आमच्या जीवावर उठलेला असा आयुक्त आम्हाला नको शिंदे साहेब…

आमच्या पाणी टंचाई विरोधातला आक्रोश पाहून ज्याच्या काळजाला पाझर फुटेल असा आयुक्त हवाय! आयुक्त हटवा, आमचा जीव वाचवा!

कल्याण ग्रामीण मतदार संघातील रस्ते, पाणी, वाहतूक कोंडी, कचरा व इतर समस्या आपल्याकडे मांडण्यासाठी मी अनेक वेळा आपल्या सोबत संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन बैठक लावावी यासाठी विनंती केली आहे. परंतु यात कोणते राजकारण आडवे येते हे मला समजत नाही आणि जर तसे काही असेल तर राजकारण बाजूला ठेवू या आणि ‘मृत्युकारण’ तपासून पाहूया. म्हणूनच मी आमदार असलो तरी हे पत्र मी एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला पाठवतो आहे.

बघू-पाहू-करु हे न करता ताबडतोब कृतीची अपेक्षा आहे. ताबडतोब बैठक घ्या, ताबडतोब निर्णय घ्या आणि ताबडतोब न्याय द्या. लाथ माराल तिथे पाणी काढणारे तुम्ही. कुठे आणि कशी लाथ मारायची ते तुम्हाला नक्कीच माहिती असणार.

बैठकीच्या निरोपाची वाट पाहतोय. धन्यवाद!