चर्चेच्या फेऱ्या बंद करा, आता निर्णय घ्या, राजू शेट्टींनी केंद्राला सुनावले

| Updated on: Dec 13, 2020 | 1:23 PM

दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा देण्यासाठी खुद्द राजू शेट्टी दिल्लीत पोहोचले आहेत.

चर्चेच्या फेऱ्या बंद करा, आता निर्णय घ्या, राजू शेट्टींनी केंद्राला सुनावले
राजू शेट्टी
Follow us on

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी दिल्लीत पोहोचले आहेत. शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले हे काळे कायदे सरकारने मागे घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही, अशी भूमिका यावेळी राजू शेट्टी यांनी मांडली. (Raju Shetti Attcked On Central GOVT Over Agriculture law)

शेतकरी ऐन थंडीत 18 दिवस आंदोलन करतो आहे. 18 दिवस त्यांचं हे आंदोलन ताणणं हे सरकारचं अपयश असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली. आता चर्चेच्या फेऱ्या थांबवून ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचं राजू शेट्टी यांनी ठणकावून सांगितलं. याचवेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या संयमाचं कौतुक केलं. लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने शेतकरी आंदोलन करत आहेत. आंदोलन कसं करायचं हे शेतकऱ्यांकडून शिकण्यासारखं आहे, असं ते म्हणाले.

“शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कायदे आहेत असं सांगून सरकारने त्यांनाच विश्वासात न घेता हे कायदे केले. सरळसरळ सांगायचं होतं की आम्ही उद्योगपतींसाठी हे कायदे करत आहोत, अशी टीका त्यांनी केंद्र सरकारवर केली. हमीभाव फक्त कागदावरच राहणार असेल तर त्याला काय अर्थ आहे? हमीभाव हा बंधनकारक करावा असं आमचं म्हणणं आहे”, असं शेट्टी म्हणाले.

“जो नियम उसाला तोच नियम बाकी पीकांना असायला हवा, अशी तरतूद करणारा कायदा करा. मी स्वत: यासंबंधीचं खाजगी विधेयक 2018 साली खासदार असताना मांडलं होतं. त्या विधेयकाला अनेक खासदारांनी पाठिंबा दिला होता. तेच विधेयक सरकारी विधेयक पाठिंबा म्हणून मांडावं”, अशी मागणी राजू शेट्टी यांनी यावेळी केली.

“सरकारने जाहीर केलेला हमीभाव तरी त्याला मिळेल आणि जो कोणी हमीभाव द्यायला टाळाटाळ करेल त्याला आम्ही तुरुंगात टाकू, असा विश्वास फक्त शेतकरी सरकारकडून मागतो आहे”, असं ते म्हणाले. दुसरीकडे फक्त पंजाब आणि हरयाणाच्या शेतकऱ्यांचा या कायद्याला विरोध आहे, भाजपच्या या टीकेला उत्तर देताना राजू शेट्टी म्हणाले, “जर महाराष्ट्रात कायद्याला विरोध नाही तर मग महाराष्ट्र बंद का झाला, असा उलट सवाल त्यांनी भाजपला विचारला. तसंच कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र, तेलंगणा बंदला प्रतिसाद का मिळाला?”

“पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्लीच्या जवळ आहेत. त्यात आता देशभरातले शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघाले आहेत. सरकारने तातडीने यासंबंधीचे निर्णय घ्यावेत आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात”, असं राजू शेट्टी म्हणाले.

संबंधित बातम्या

दिल्ली शेतकरी आंदोलन : राजनाथ सिंह यांच्या भेटीनंतर चौटाला यांचा आश्चर्यजनक दावा, म्हणाले…