
ब्रिजभान जैस्वार, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: दिवंगत आमदार रमेश लटके (ramesh latke) यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई महापालिकेने फेटाळून लावला आहे. तांत्रिक अडचणींचे कारण पुढे देत हा राजीनामा फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांनी कोर्टात धाव घेतली आहे. कोर्टाने लटके यांची याचिका दाखल करून घेतली असून उद्या उच्च न्यायालयात (bombay high court) त्यावर सुनावणी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. ऋतुजा लटके (rutuja latke) यांनी आपल्या याचिकेत एकूण सात मुद्द्यांवर भर दिला आहे. त्यामुळे या सात मुद्द्यांवर कोर्ट काय निर्णय देते हे उद्याच स्पष्ट होणार आहे.
ऋतुजा लटके यांच्या याचिकेवर उद्या सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे. आज मुंबई हायकोर्टात ऋतुजा लटके यांच्यावतीने वकील विश्वजीत सावंत यांनी आज न्यायमूर्ती जामदार आणि न्यायमूर्ती देशमुख यांच्या खंडपीठापुढे प्रकरण मेंशन करून सुनावणी संदर्भात मागणी करण्यात आली. मुंबई हायकोर्टाकडून संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ऋतुजा लटके या मुंबई महानगरपालिकेच्या के परिमंडळ उपायुक्तांच्या कार्यालयात कार्यरत आहेत. ऋतुजा लटके यांनी एक महिना अगोदर दिलेला राजीनामा अद्यापही मंजूर न केल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. वकील विश्वजीत सावंत यांनी आज कोर्टात लटके यांच्यावतीने बाजू मांडली.
3 ऑक्टोबरला दिलेला राजीनामा अद्याप पालिकेनं स्वीकारलेला नाही
माझा राजीनामा तातडीनं स्वीकारत 1 महिन्याचा नोटीस कालावधी माफ करण्यात यावा
ऋतुजा लटके पती रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर पोट निवडणुकीत लढण्यास इच्छुक असल्याचा याचिकेत उल्लेख
उमेदवारी अर्ज भरण्याची 14 ऑक्टोबर ही शेवटची तारीख असल्यानं उद्याच हायकोर्टाचा निकाल अपेक्षित
ऋतुजा लटके यांनी आधी निवडणुकीकरता मुभा मागितली होती, मात्र ती पालिकेनं नाकारली आहे
त्यानंतर दिलेला राजीनामाही पालिकेनं अद्याप स्वीकारला नसल्याची याचिकेत माहिती
मात्र लटके या कोणत्या पक्षावर आणि चिन्हावर लढवणार याचा याचिकेत उल्लेख करण्यात आलेला नाही.