विकास दुबे ‘नेपाळमधील दाऊद’ ठरु नये, यूपीतील गुंडशाहीवरुन ‘सामना’चा योगी सरकारवर हल्लाबोल

| Updated on: Jul 06, 2020 | 8:35 AM

कानपूरमधील पोलीस हत्याकांडाने योगी आदित्यनाथ यांच्या दाव्यांवर भलेमोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे" अशी टीका 'सामना'तून करण्यात आली आहे.

विकास दुबे नेपाळमधील दाऊद ठरु नये, यूपीतील गुंडशाहीवरुन सामनाचा योगी सरकारवर हल्लाबोल
Follow us on

मुंबई : “40 वर्षांनंतरही उत्तर प्रदेशात पोलिसांना गुंड अशा पद्धतीने मारु शकत असतील तर योगी महाराजांच्या उत्तर प्रदेशात बदलले काय?” असा सवाल ‘सामना’च्या अग्रलेखातून योगी सरकारला विचारण्यात आला आहे. “विकास दुबे नेपाळमध्ये फरार होऊ शकतो असा संशय असल्याने उत्तर प्रदेश पोलिसांनी सीमा सील वगैरे केल्याच्या बातम्या आहेत. या पार्श्वभूमीवर उद्या विकास दुबे आपल्यासाठी ‘नेपाळमधील दाऊद’ ठरु नये म्हणजे मिळवले, असेही ‘सामना’त म्हटले आहे. (Saamana Editorial on Uttar Pradesh CM Yogi Adityanath on Kanpur Encounter Vikas Dubey)

“आज जनता कोरोना लॉकडाऊनमध्ये बंदिस्त आहे. उद्या गुंडांपासून सुरक्षित राहण्यासाठी लॉकडाऊनमध्ये राहावे लागेल का, असा प्रश्न तेथील जनतेच्या मनात आहे. कारण उत्तर प्रदेश म्हणजे उत्तम प्रदेश असे म्हटले जाते. उत्तम प्रदेश पोलिसांच्या रक्ताने भिजला. देशाला हा धक्का आहे” असेही ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.

“गुंड टोळ्या आणि त्यांच्या गुन्हेगारीमुळे उत्तर प्रदेशसारखे राज्य दशकानुदशके बदनाम राहिले आहे. विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील गुंडागर्दी संपुष्टात आणली असे दावे अनेकदा केले गेले. मात्र कानपूरमधील पोलीस हत्याकांडाने या दाव्यांवर भलेमोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे” अशी टीका ‘सामना’तून करण्यात आली आहे.

हेही वाचा : मजुरांनी उद्धव ठाकरे जिंदाबादच्या घोषणा दिल्या, ते कदाचित योगींना आवडलं नसेल : संजय राऊत

“ज्या पद्धतीने दुबे आणि गुंडांकडून पोलिसांवर गोळीबार झाला, त्यावरून या कारवाईची ‘टिप’ दुबेला आधीच मिळाली असावी. किंबहुना, त्याच आरोपावरुन चौबेपूर पोलीस ठाण्याचा प्रमुख विनय तिवारी याला आता निलंबित करण्यात आले आहे. त्याची चौकशीही सुरु आहे. त्यातून काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागतीलच, पण उत्तर प्रदेशातील गुंड-पोलीस ‘लागेबांधे’ कसे आहेत याचाच पुरावा या घटनेने दिला आहे” असा घणाघातही ‘सामना’तून करण्यात आला आहे.