दिल्लीतील काही नेत्यांनी सावरकरांचं चरित्र वाचावं, काहींनी शिवरायांचं : सामना

| Updated on: Jan 14, 2020 | 8:43 AM

'नरेंद्र मोदी हे कर्तबगार आणि लोकप्रिय नेते आहेत. देशाचे पंतप्रधान म्हणून आज त्यांना तोड नाही, पण तरीही ते देशाचे छत्रपती शिवाजी आहेत काय? असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे

दिल्लीतील काही नेत्यांनी सावरकरांचं चरित्र वाचावं, काहींनी शिवरायांचं : सामना
Follow us on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने सर्वसामान्यांतून संतापाची लाट उमटली आहे. त्यातच शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तून ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक म्हणजे ढोंग आणि चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना असल्याची टीका करण्यात आली आहे. दिल्लीतील काही नेत्यांनी वीर सावरकरांचे चरित्र वाचावे आणि दिल्लीतील भाजप पुढाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यावेत’ असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनाही टोला लगावण्यात आला (Saamana on Aaj Ke Shivaji Narendra Modi) आहे.

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक म्हणजे ढोंग आणि चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना आहे. महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनी या ढोंगी प्रकाराचा खुल्या दिलाने निषेध केला पाहिजे. आता भाजपवाले म्हणतात, गोयलशी आमचा काय संबंध? संबंध नाही कसा? पक्ष कार्यालयात पुस्तक प्रसिद्ध झाले व ते भाजपचे नेते त्या वेळी हजर होते. यावर महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनीच बोलायचे आहे. 11 कोटी जनता बोलते आहेच.’ असं सामनाच्या अग्रलेखातून सुनावण्यात  आलं आहे. देशभरातील विरोधानंतर हे पुस्तक मागे घेण्यात आलं आहे.

छत्रपती शिवरायांचे वारसदारही आता चिडले आहेत. छत्रपती शिवरायांचा अपमान झाला आहे. शिवरायांच्या वंशजांनी म्यानातून सपकन तलवार काढावी. ती आता काढली आहे व त्याबद्दल त्यांचे आभार. भाजपाची तोंडे म्यान झाली म्हणून आम्ही हे ‘शिवव्याख्यान’ मांडले, असंही अग्रलेखात पुढे म्हटलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त पुस्तक अखेर मागे

‘नरेंद्र मोदी हे कर्तबगार आणि लोकप्रिय नेते आहेत. देशाचे पंतप्रधान म्हणून आज त्यांना तोड नाही, पण तरीही ते देशाचे छत्रपती शिवाजी आहेत काय? त्यांना छत्रपती शिवरायांचे स्थान देणे योग्य आहे काय? याचे उत्तर एका सुरात ‘नाही… नाही!’ असेच आहे.’ असं ‘सामना’त म्हटलं आहे.

‘पंतप्रधान मोदींनाही ही तुलना आवडली नसेल, पण फाजील उत्साही भक्त आपल्या नेत्यांना अडचणीत आणतात, तसे आता झाले आहे. दिल्लीतील काही नेत्यांनी वीर सावरकरांचे चरित्र वाचावे आणि दिल्लीतील भाजप पुढाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यावेत’ असं म्हणत राहुल गांधींना टोला लगावण्यात (Saamana on Aaj Ke Shivaji Narendra Modi) आला आहे.