Sachin Ahir: शिंदे गटात प्रवेश करताच सचिन अहिरांना लागली लॉटरी, थेट उपसभापती…
Sachin Ahir: विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी काल ठाकरे गटाला रामराम ठोकत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आज सचिन अहिर यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे.

काल एक मोठी राजकीय घडामोड घडली. शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषद आमदार सचिन अहिर यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी अर्ज केला. ही सचिन अहिर यांच्यासाठी लॉटरी असल्याचे म्हटले जात आहे. आता या पदाचा निकाल समोर आला आहे. सचिन अहिर यांची बिनविरोध उपसभापती म्हणून निवड करण्यात आली आहे.
विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून शिवसेना शिंदे गटचे आमदार सचिन अहिर आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे जगन्नाथ अभ्यंकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. विधान परिषदेतील संख्याबळ लक्षात घेता महायुतीचा एकतर्फी विजय निश्चित होता. मात्र, तरीही भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांना अर्ज मागे घेण्याची विनंती केली. त्यानुसार, ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सभागृहात घोषणा केली की, सभागृहाची इच्छा आहे की सर्वानुमते निवड व्हावी, त्यामुळे आम्ही आमचा उमेदवारी प्रस्ताव मागे घेत आहोत.
सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करताच उपसभापती पदासाठी अर्ज भरला होता. त्यानंतर आज त्यांची उपसभापती म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात सचिन अहिर यांचे अभिनंदन केले.
सचिन अहिर कोण?
सचिन अहिर हे महाराष्ट्रातील अनुभवी आणि सक्रिय राजकीय नेते आहेत. पूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित होते आणि नंतर शिवसेना ठाकरे गटात सामील झाले होते. आता एकनाथ शिंदे गटात प्रवेश करून त्यांनी आपल्या राजकीय भविष्याला नवी दिशा दिली आहे. उपसभापती पद मिळवून त्यांना महाराष्ट्र विधान परिषदेत महत्त्वपूर्ण जबाबदारी मिळाली आहे. या विकासामुळे शिंदे गटाला विधान परिषदेत अधिक मजबूत उपस्थिती मिळाली आहे. तर ठाकरे गटाला एक अनुभवी आमदार गमावण्याचा धक्का बसला आहे. सचिन अहिर यांच्या बिनविरोध निवडीमुळे शिंदे गटात आनंदाचे वातावरण आहे. अनेक नेते याला “लॉटरी लागल्यासारखी” घटना म्हणून पाहत आहेत.