‘हा’ भाजप नाहीच, 90% लोक वॉशिंग मशीनमधून धुतलेले फडके, संजय राऊत यांचा घणाघात

भाजप स्थापना दिवसानिमित्त संजय राऊत यांनी सराकारमधील आमदारांच्या भ्रष्टाचारावर कडाडून टीका केली.

हा भाजप नाहीच, 90% लोक वॉशिंग मशीनमधून धुतलेले फडके, संजय राऊत यांचा घणाघात
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 06, 2023 | 11:15 AM

ठाणे: भाजपचा (BJP) स्थापना दिवस आज देशभरात साजरा केला जातोय. मात्र सध्या भाजपमध्ये असलेले लोक हे भाजपाचे नाहीतच, असा दावा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय. त्यातले 90%  लोक हे बाहेरून आलेले.  भाजपच्या वॉशिंग मशीनमधून धुवून निघालेले फडके आहेत, असा घणाघात राऊत यांनी केलाय. जे भाजपात आहेत आणि जे येत्या काळात प्रवेश करणार आहेत, त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यांच्यासाठी धुलाई यंत्र काम करते. तर विरोधी पक्षातील नेत्यांविरोधात ईडी आणि सीबीआयसारख्या यंत्रणांचा गैरवापर केला जातो, असा आरोप राऊत यांनी केला. तसेच विरोधी पक्षांची याचिका कोर्टाने रद्द केल्यानंतर भाजप नाचायला लागली, हा काय प्रकार आहे, असा सवाल संजय राऊत यांनी केलाय.

याचिकेवरून पुढे काय?

देशातील १४ विरोधी पक्षांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. काल सुप्रीम कोर्टाने सदर याचिका फेटाळून लावली. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप सरकारला याद्वारे मोठा दिलासा मिळाल्याचं म्हटलं जातंय. मात्र यावरून संजय राऊत यांनी भाजपला सुनावलंय. ते म्हणाले, ‘ याचिका तात्पुरती रद्द केली आहे. काही पुराव्यांची पूर्तता त्यात झालेली नाही. फक्त कालची याचिका ऐकण्यास नकार दिला. त्यात बदल करून आम्ही पुन्हा एकदा याचिका दाखल करणार आहोत. पण एवढ्यावरच भाजपचे नेते कोंबडी बाजा लावून नाचायला लागलेत. यंत्रणांचा विरोधकांविरोधात गैरवापर केला जातोय, असा आरोप राऊत यांनी केला.

भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकलेलं लोकांवर कारवाया का करत नाहीत… जे तुमच्या पक्षात आहेत, भविष्यात होणार आहेत, त्यांच्यावर कारवाई नाही. मी स्वतः राज्यातील दोन प्रकरणं गृहमंत्र्यांकडे दिले आहेत. ऑडिट रिपोर्ट देऊनही कारवाई होत नाही, असा आरोप राऊत यांनी केलाय. भाजप आमदार राहुल कुल यांच्या भीमा पाटस कारखान्यात ५०० कोटी रुपयांचे मनीलाँडरींग झाल्याचे मी पुरावे दिले आहेत, पण कारवाई का नाही… याचं उत्तर फडणवीस यांनी द्यावं.
भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर घेऊन बसले आहेत. विरोधकांना भिजलेली काडतुसं मारतायत. भ्रष्टाचारी आणि गुंडांना पाठिशी घालतायत. गुंड ज्या प्रमाणे अंडरवर्ल्डमध्ये एखादा एरिया चालवतात. त्याप्रमाणे हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्य चालवतात, असा आरोप राऊत यांनी केलाय.

खरा भाजप काय होता, हे भाजपच्या स्थापनेच्या वेळी आम्ही अनुभवलं आहे. त्या वेळेसारखे आज कुणीही भाजपमध्ये नाहीत, असा दावा राऊत यांनी केलाय.