
Sanjay Raut : शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे आज (17 मे) प्रकाशन पार पडले. या प्रकाशन सोहळ्यानिमित्त संजय राऊत यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी तुरुंगातील उंदराची एक खास कथा सांगितली. विशेष म्हणजे या उंदाराचं नामकरण करण्यात आल्याचंही सांगत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.
“मी एकदा तुरुंगात उभा होतो. तेव्हा मला काहीतरी दिसलं. मी म्हणालो इथे ससे कुठून आले. कुंदन शिंदे म्हणाले साहेब तो उंदीर नाही ससा आहे. तिथे सशासारखे उंदीर धिप्पाड आहेत. अनिल देशमुखांनी त्यांना नावे ठेवली होती. आता त्यांच्याविषयी बोलणं योग्य नाही. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मर्यादा पाळल्या पाहिजेत,” अशी टोलेबाजी राऊत यांनी केली.
“दर दिवशी माझं संपादकीय रोज बाहेर यायचं. सरकारने चौकशी लावली. माझं रोखठोक येत होतं. मी खूश होतो. कारण माझं काम होत होतं. आतल्या गोष्टी आतच बऱ्या. या कटू आठवणी असल्या तरी माझ्यासारखा माणूस खचत नाही. कारण आम्ही बाळासाहेबांसोबत काम केलं. त्यांनी तीच शिकवण दिली खचू नक,” असंही राऊत म्हणाले.
“मी कोठडीत होतो आणि सरकारवर टीका करणारं माझं रोखठोक प्रसिद्ध झालं. संजय राऊत तुरुंगात आहेत. पण रोखठोक प्रसिद्ध कसं झालं? असा प्रश्न त्यांना पडला. त्यामुळे माझ्याकडे दोन अधिकारी आले. त्यांनी रात्री उठवलं. चौकशी सुरू केली. मी राज्यपालांवर लिहिलं होतं. म्हटलं मी आधीच लिहून आलो होतो. म्हटलं मला माहीत होतं ते घाण करणार आहेत. तुमच्याकडे सीसीटीव्ही आहे. तुम्ही चेक करा, असं त्यांना मी म्हणालो होतो,” अशी आठवण राऊतांनी सांगितली. वाक्यात सांगतो पुस्तकात रडगाण नाही.
मला अटक केली त्याला पश्चाताप झाला. आम्ही गुंडे आहोत. आम्ही तुरुंगात जायला घाबरत नाही. देशाला अशाच लोकांची गरज आहे. लोहा लोह्याला कापतो, असंही राऊतांनी ठणकावून सांगितलं.