ठाकरे बंधूंच्या बैठकीत नेमकी कशावर चर्चा? राऊतांनी समोर येत सगळं सांगितलं, म्हणाले…

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची बैठक पार पडली आहे. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीत काय काय घडलं? याबाबत संजय राऊतांनी माहिती दिली आहे.

ठाकरे बंधूंच्या बैठकीत नेमकी कशावर चर्चा? राऊतांनी समोर येत सगळं सांगितलं, म्हणाले...
raj thackeray and uddhav thackeray
| Updated on: Sep 10, 2025 | 4:19 PM

Uddhav Thackeray And Raj Thackeray Meeting : गेल्या अनेक दिवासाांपासून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची युती होणार असल्याचे बोलले जात आहे. ही युती घडून येण्यासाठी पडद्यामागे बऱ्याच हालचाली होत आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेमची यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तब्बल पावणे तीन तास चालेल्या या बैठकीत नेमकं काय घडलं? असं विचारलं जात आहे. असे असतानाच आता शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या बैठकविषयी प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे बंधूंच्या बैठकीत नेमकं काय घडलं? याबाबत त्यांनी सांगितलं आहे.

ही भेट राजकीय नव्हती

राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ बंगल्यावरील भेट संपल्यानंतर संजय राऊतांनी माध्यम प्रतिनिंधींशी संवाद साधला. ठाकरे बंधूंच्या बैठकीवेळी राऊत हेदेखील तिथे उपस्थित होते. माध्यांशी बोलताना त्यांनी दोन्ही ठाकरे बंधूंची भेट ही राजकीय नव्हती, असे सांगितले आहे. “उद्धव ठाकरे यांच्यासोबत मीदेखील होतो. आम्ही राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेलो. त्यात कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता. यात काहीही राजकीय कारण नव्हतं,” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

उद्धव ठाकरेंच्या मावशीने बोलवले होते

तसेच, गणेशोत्सवाच्या काळात उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी गेले होते. तेव्हा राज ठाकरे यांच्या आई म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या मावशी यांनी निघताना उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं की गर्दीमध्ये आपल्याला बोलता आलं नाही. तू मला परत भेटायला ये. यानुसारच उद्धव ठाकरे हे कुंदा मावशींना भेटायला राज ठाकरे यांच्या घरी गेले होते, असेही त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे राज ठाकरेंना नेमकं का भेटले याबद्दल मी सांगितलं आहे. माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे. कारण मी सत्य सांगतो, अशी पुष्टीही संजय राऊत यांनी जोडली.

दरम्यान, मुंबई तसेच राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यासाठी बोलणी चालू आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.