आता कुणाचा बकरा कापला जाणार…पौर्णिमा आली की…संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर सडकून टीका!

कुणाल कामराने आपल्या कवितेत ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकात्मक भाष्य केले होते.

आता कुणाचा बकरा कापला जाणार...पौर्णिमा आली की...संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर सडकून टीका!
sanjay raut and eknath shinde
| Updated on: Apr 16, 2025 | 6:05 PM

Sanjay Raut : गेल्या काही दिवसांपासून विनोदवीर कुणाल कामराने केलेल्या कवितेवरून राजकीय वातावरण तापलेले आहे. त्याने आपल्या कवितेत ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकात्मक भाष्य केले होते. कुणाल कामराच्या याच कवितेचा उल्लेख करत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर त्यांचे नाव न घेता तुफान टोलेबाजी केली. आज अमावश्या, पौर्णिमा आली की महाराष्ट्राला भीती वाटते. आता कोणाचा बकरा कापला जाणार, असा प्रश्न पडतो, असा हल्लाबोल राऊतांनी केला. ते नाशिकमधील शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते.

पौर्णिमा-अमावश्या आली महाराष्ट्राला की भीती वाटते

सध्या राज्यात ठाणे की रिक्षा, चेहरेपे दाढी, चष्मा असं सध्या महाराष्ट्रात चालू आहे. हे महाशय आता पुन्हा एकदा गावाला गेलेले आहेत. आज पौर्णिमा आहे. अमावस्या आहे. कुणाचा बकरा कापणार आहे. आता पौर्णिमा अमावश्या आली महाराष्ट्राला की भीती वाटते,” अशी टोलेबाजी संजय राऊत यांनी केली. हा महाराष्ट्र एवढा अंधश्रद्धाळू कधीच झाला नव्हता. हा महाराष्ट्राचा फुले, शाहू, आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र आहे, असेही राऊत म्हणाले.

आम्ही लढायला तयार, तुम्ही…

“आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत. मोदी, शाह, फडणवीस तुम्ही कधी हिंदू झालात. एक सुंदर वाक्य आहे. जो जितका पापी कपटी आणि पाखंडी असतो तो हिंदुत्ववादी असल्याचं ढोंग करतो. आम्ही आहोत हिंदुत्ववादी, आम्हाला बाळासाहेबांनी बाळकडू दिलं आहे. आजच्या शिबीराचा एकच संदेश आहे, आम्ही लढायला तयार आहोत. तुम्ही खोटे गुन्हे दाखल करा. आम्ही संघर्ष करायला तयार आहोत. आम्ही आमच्या नेत्याच्या मागे उभं राहू. उद्धव ठाकरे यांच्या मागे उभं राहू,” असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला.

…पण कार्यक्रम झालाच- राऊत

संजय राऊतांनी पुढे आपल्या भाषणात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना लढाई चालू ठेवण्याचा सल्ला दिला. त्यासाठी त्यांनी छावा चित्रपटातील कवितेचाही उल्लेख केला. नाशिक जिल्ह्यातील आजचा कार्यक्रम होऊ नये म्हणून फार प्रयत्न करण्यात आले. भाजपाने आज दर्गे पाडण्याची मोहीम हाती घेतली आहे. पण आज कार्यक्रम झालाच, असे म्हणत त्यांनी नाशिक जिल्ह्यातील ठाकरेंच्या शिवसेनच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.