आसनव्यवस्था बदलल्याने नाराज, संजय राऊतांचं सभापतींना खरमरीत पत्र

शिवसेनेचा आवाज दाबण्यासाठी जाणूनबुजून आसनव्यवस्था बदलल्याचा आरोप संजय राऊतांनी सभापतींना लिहिलेल्या पत्रातून केला आहे.

आसनव्यवस्था बदलल्याने नाराज, संजय राऊतांचं सभापतींना खरमरीत पत्र
| Updated on: Nov 20, 2019 | 3:22 PM

नवी दिल्ली : राज्यसभेतील आसनव्यवस्थेत बदल केल्यामुळे नाराज झालेले शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी सभापती व्यंकय्या नायडू यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे. शिवसेनेचा आवाज दाबण्यासाठी जाणूनबुजून हा प्रकार गेला जात असल्याचा आरोप राऊतांनी (Sanjay Raut letter to Rajya Sabha Chairman) पत्रातून केला आहे.

राज्यसभा सदनातील माझी बसण्याची जागा तिसऱ्या रांगेतून पाचव्या रांगेत बदलल्याचं पाहून मी आश्चर्यचकित झालो. शिवसेनेच्या भावना दुखावण्यासाठी आणि आमचा आवाज दडपण्यासाठी जाणीवपूर्वक हा निर्णय एखाद्याने घेतला आहे, असा आरोप संजय राऊत यांनी नायडूंना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

एनडीएतून शिवसेनेला हटवण्याबाबत कुठलीही औपचारिक घोषणा झालेली नसताना या अतार्किक कृत्यामागील कारण मला समजत नाही. या निर्णयामुळे सदनाच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचली आहे. मी विनंती करतो की महाराष्ट्रातील दीनदुबळ्या जनतेचा आवाज मांडता यावा, यासाठी आम्हाला पहिल्या/दुसऱ्या/तिसऱ्या रांगेतील जागा द्यावी आणि सभागृहाचा सन्मान राखावा, असंही राऊतांनी म्हटलं आहे. हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे.

एनडीएतून बाहेरचा रस्ता

भाजपने शिवसेनेला लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी बाकावर जागा देत एनडीएतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत रविवारी घोषणा केली होती.

अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची रवानगी पहिल्या रांगेतून तिसऱ्या रांगेत करण्यात आली होती. शिवसेनेच्या लोकसभेतील इतर खासदारांनाही नवीन जागा देण्यात आल्या. सावंत यांनी गेल्या आठवड्यात अवजड उद्योग मंत्रिपदाचा राजीनामा देत सेना-भाजप युतीच्या फुटीचे संकेत दिले होते. त्यानंतर या मंत्रालयाचा अतिरिक्त भार प्रकाश जावडेकरांकडे सोपवण्यात आला.

शिवसेना एनडीएच्या बैठकांना हजर राहत नव्हती. त्यांचे मंत्री अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना काँग्रेससोबत काम करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनीच विरोधीपक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही त्यांच्या या निर्णयाशी सहमत आहे. म्हणूनच आम्ही शिवसेनेला लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधीबाकावर जागा दिली आहे, असं प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं होतं.

शिवसेनेला एनडीएच्या बैठकीचं निमंत्रणच नव्हतं, मग शिवसेना एनडीएच्या बैठकीला जाण्याचा आगाऊपणा कसा करेल? असा प्रतिप्रश्न शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला होता.(Sanjay Raut letter to Rajya Sabha Chairman)