‘एकनाथ खडसे शिवसेनेत येणार का?’ प्रश्नावर संजय राऊतांचं मोठं विधान

| Updated on: Nov 28, 2019 | 10:29 AM

एकनाथ खडसे हे नेहमीच आमच्या संपर्कात होते, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

एकनाथ खडसे शिवसेनेत येणार का? प्रश्नावर संजय राऊतांचं मोठं विधान
Follow us on

मुंबई : एकनाथ खडसे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत, असा प्रश्न विचारल्यावर, खडसे हे नेहमीच आमच्या संपर्कात होते, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. एकनाथ खडसेंनी कालच भाजपवर आगपाखड केल्यामुळे त्यांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांना (Sanjay Raut on Eknath Khadse) उधाण आलं आहे.

अजित पवार यांच्याविरोधातील सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे रद्दीत विकले. मी, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना डावलल्याचा फटका भाजपला बसल्याचा घणाघातही खडसेंनी केला होता.

आधी जे सत्ताधारी होते, त्यांच्याविरोधातही ईडीची चौकशी करता येण्यासारखे पुरावे आहेत. मात्र सूडाचं राजकारण करणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण सत्तेत येताच अचानक त्यांचं नाव कसं काय ईडी चौकशीसाठी समोर आलं, हा प्रश्न पडतो. राष्ट्रपती भवन ते राजभवन आणि सीबीआय ते ईडी अशा केंद्राच्या ताब्यातील सर्व संस्थांचा वापर राज्यातील सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी केला जात आहे. शिवसेनेच्या नेतृत्वात महाविकासआघाडी सरकार स्थापन होऊ नये, यासाठी महिन्याभरात हरतऱ्हेचे प्रयत्न झाले, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.

मला, बावनकुळे, तावडेंना डावलल्याचा फटका, बैलगाडीभर पुरावे रद्दीत विकले, खडसेंचा उद्रेक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः फोन करुन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र राज्य पुढे नेण्यास केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचं वचन त्यांनी दिलं. त्यामुळे शपथविधी सोहळ्याला त्यांनी यावं ही अपेक्षा असल्याचं संजय राऊत म्हणाले.

विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला, तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्याबाबत निर्णय तिन्ही पक्षांच्या एकत्रित बैठकीत झाल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आता आदित्य ठाकरे यांचे फक्त पिता राहिलेले नाहीत, तर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे आदित्य यांना मंत्रिपद देण्याबाबत ते वडील नाही, तर मुख्यमंत्री या नात्याने निर्णय घेतील, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. अजित पवारांच्या बाबतीतही शरद पवारच निर्णय घेणार असल्याचं राऊतांनी सांगितलं.

उद्धव ठाकरेंनी ‘सामना’चं संपादकपद सोडलं, हा आमचा अंतर्गत निर्णय आहे. ते मुख्यमंत्रिपदावर विराजमान होणार असल्यामुळे काही संकेत पाळावे लागतात, असं संजय राऊत (Sanjay Raut on Eknath Khadse) यांनी स्पष्ट केलं.