संजय राऊत पुन्हा ‘सिल्व्हर ओक’वर, पवारांशी नऊ मिनिटांची भेट घेऊन ‘मातोश्री’कडे कूच

| Updated on: Nov 06, 2019 | 11:20 AM

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेआधी 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी संजय राऊत यांच्यासोबत त्यांची नऊ मिनिटांची भेट झाली

संजय राऊत पुन्हा सिल्व्हर ओकवर, पवारांशी नऊ मिनिटांची भेट घेऊन मातोश्रीकडे कूच
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच सुटता सुटत नसताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवार विरोधी पक्षात बसण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. पवारांच्या पत्रकार परिषदेआधी ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी दोघांची भेट (Sanjay Raut Sharad Pawar meet) झाली. नऊ मिनिटांच्या भेटीनंतर राऊत ‘मातोश्री’वर गेले.

‘शरद पवार साहेबांना भेटलो, नेहमीप्रमाणे ही सदिच्छा भेट होती. राज्यातील अस्थिर परिस्थितीवर पवारांनी चिंता व्यक्त केली. जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोधात बसण्याचा कौल दिल्यामुळे आपण विरोधी बाकावर बसणार असल्याचं पवारांनी सांगितलं’, असं संजय राऊत म्हणाले.

31 ऑक्टोबरला राऊतांनी पवारांची भेट घेतली होती. दिवाळी निमित्त शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं होतं. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचंही राऊत म्हणाले होते. आता सत्तास्थापनेचं घोंगडं भिजत असताना राऊत-पवारांची पुनर्भेट राजकीय वर्तुळात चर्चेला तोंड फोडण्यास पुरेशी आहे.

शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. संजय राऊत यांनी शिवसेनेकडे अनेक पर्याय असल्याचं म्हटलं होतं. राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी मदत करण्यास सकारात्मक असल्याचीही चर्चा आहे. अशा सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत पुन्हा शरद पवारांची भेट घेणं भुवया उंचावणारं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत ‘सिल्व्हर ओक’वर, शरद पवारांची भेट!

एकीकडे, शिवसेना-भाजप यांच्यात मध्यस्थीसाठी रा. स्व. संघाने पुढाकार घेतला आहे. हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर युती टिकून रहावी, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका आहे. अयोध्या प्रकरणी लवकरच निकाल येणार आहे. अशा स्थितीत सेना-भाजप एकत्र असणं गरजेचं असल्याचं संघाचं मत आहे. संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे.

विविध पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठींनाही सध्या जोर आलेला आहे. आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर संजय राऊतांचा पवारांसोबत भेटीगाठींचा सिलसिला सुरु झाला. भाजप नेत्यांशी शिवसेनेशी चर्चा अडलेली असताना शरद पवारांकडून सेना राजकीय सल्ला घेणार का, (Sanjay Raut Sharad Pawar meet) याची उत्सुकता आहे.

विधानसभा निवडणुकीत 56 जागा जिंकणाऱ्या शिवसेनेचं संख्याबळ अपक्षांच्या जोरावर 64 वर पोहोचलं आहे. आतापर्यंत 8 अपक्षांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.