‘भाजप कार्यकर्ता नटी म्हणते मुंबई म्हणजे PoK, योगींनी सांगावं ते नेमके कुठे आलेत’, संजय राऊतांचा टोला

| Updated on: Dec 02, 2020 | 6:21 PM

योगींनी सांगावं ते नेमकं मुंबईत आलेत की पाकव्याप्त काश्मीमध्ये, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. (Sanjay Raut Yogi Adityanath)

भाजप कार्यकर्ता नटी म्हणते मुंबई म्हणजे PoK, योगींनी सांगावं ते नेमके कुठे आलेत, संजय राऊतांचा टोला
Follow us on

मुंबई : “ती नटी म्हणतेय की मुंबई पाकव्याप्त काश्मीर आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) मुंबईत आले आहेत. त्यांनी स्पष्ट करावं की ते नेमकं मुंबईत आलेत की पाकव्याप्त काश्मीमध्ये,” असा सणसणीत टोला सिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अप्रत्यक्षपणे अभिनेत्री कंगना रनौत तसेच योगी आदित्यनाथ यांना लगावला. यावेळी राऊत यांनी कंगना रनौतला भाजपची कार्यकर्ती असलेली नटी संबोधलं आहे. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. (Sanjay Raut slams Yogi Adityanath over Mumbai and Bollywood)

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असल्यामुळे राजकीय टीका-टीप्पणीला उधाण आले आहे. संजय राऊत यांनीदेखील त्यांच्यावर खोचक टीका केली आहे. “भाजपची कार्यकर्ता असलेली ती नटी मुंबई ही पाकव्याप्त काश्मीर असल्याचं म्हणाली होती. योगी आदित्यनाथ मुंबईत आलेत की पाकव्याप्त काश्मीरमध्ये आलेत हे त्यांनी स्पष्ट करावं. योगी आदित्यनाथ यांनी सांगायला हवं की मी मुंबईत आलो आहे. मुंबईत सुरक्षित असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी सांगायला हवं,” असं राऊत म्हणाले.

मुंबईला कुणी नख लावू शकत नाही

योगी आदित्यनाथ मुंबईतील बॉलिवूड, तसेच राज्यातील उद्योगांसाठीची गुंतवणूक उत्तर प्रदेशात घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. ‘मुंबईत सर्वांना यावं लागतं, मुंबई देशाचे पोट भरते. उत्तर प्रदेशात गुंतवणूक वाढवण्यासाठी योगींना मुंबईतच यावं लागलं, हा मुंबईचा गौरव आहे. मुंबईचे जे महत्व आहे, त्याला कुणीही नखं लावू शकत नाही. युपीसारख्या मागास राज्याचा विकास होणार असेल तर आम्ही स्वागत करतो,” असे राऊत म्हणाले.

उत्तर प्रदेश पाहायचे असेल तर ‘मिर्झापूर’ वेब सिरिज पाहा

संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशमधील सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर टिप्पणी केली आहे. उत्तर प्रदेशची स्थिती बघायची असेल तर मिर्झापूर वेब सिरिज पहा, असे राऊत यांनी म्हटलंय. तसेच, या सिरिजमध्ये दाखवलेली स्थिती जर सत्य असेल तर तिथं फिल्मसिटी नेवून काय करणार?, असा उपरोधिक सावालदेखील त्यांनी विचारला आहे. यापूर्वीही नोएडात फिल्मिसिटी निर्माण केली होती. तिचाही त्यांनी जिर्णोद्धार केला पाहिजे. त्या फिल्मसिटीचे काय झाले? असं त्यांनी योगींना विचारलं. तसेच, मुंबईशी स्पर्धा करणं न्यूयॉर्कलाही जमलं नाही, असे म्हणत राऊत यांनी योगींना अप्रत्यक्षपणे डिवचलं.

दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. ‘आम्ही काहीच घेऊन जायला आलेलो नाहीत. आम्ही तर नवी फिल्मसिटी तयार करण्यासाठी आलो आहोत, असं योगी आदित्यनाथ म्हणाले. तसेच, बॉलिवूड मुंबईतच राहील, अशी ग्वाहीदेखील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली.

“बॉलिवूडमधील दिग्गजांचा अनुभव घेऊन त्यांच्या सूचनेनुसार नवं मॉडल तयार करायचं आहे. वर्डक्लास फिल्मसिटी तयार करण्यासाठी मी फिल्मी दुनियेतील लोकांशी चर्चा केली. आम्ही कुणाचं काही घेऊन जाणार नाही. आम्हाला नवी निर्मिती करायची आहे. त्यासाठी आलो आहोत,” असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

योगी आदित्यनाथ यांनी फक्त मुंबईशीच पंगा घेतलाय का?; संजय राऊतांचा सवाल

उद्योगांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात काहीच गैर नाही; योगींच्या दौऱ्याची भाजपकडून पाठराखण

अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईत आलेला ‘ठग’, योगींचे नाव न घेता मनसेची खरमरीत टीका

(Sanjay Raut slams Yogi Adityanath over Mumbai and Bollywood)