Sanjay Raut : शिवसेना नेते संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढला; 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

| Updated on: Aug 22, 2022 | 11:30 AM

Sanjay Raut : संजय राऊत यांना ईडीच्या विशेष न्यायालयाने 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानुसार आज राऊत यांची कोठडी संपली. त्यामुळे त्यांना आज कोर्टात हजर करण्यापूर्वी जेजे रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

Sanjay Raut : शिवसेना नेते संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढला; 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: गोरेगावच्या पत्राचाळ प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना आजही दिलासा मिळू शकला नाही. राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राऊत यांना आता आर्थर रोड तुरुंगात 5 सप्टेंबरपर्यंत राहावं लागणार आहे. राऊत यांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना आज ईडीच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने राऊत यांच्या कोठडीत वाढ केली. राऊत यांच्या अटकेनंतरही ईडीने (ED) मुंबईतील अनेक ठिकाणी धाडसत्र केलं. गोरेगाव येथेही राऊत यांच्या संबंधितांवर ईडीने धाड मारली होती. त्यात ईडीला काही महत्त्वाचे पुरावे सापडल्याचं सांगितलं जातं. त्यामुळेच राऊत यांच्याविरोधात भक्कम पुरावे तयार झाल्याने राऊत यांना कोर्टाकडून (court) दिलासा मिळू शकला नाही, असं सूत्रांनी सांगितलं.

संजय राऊत यांना ईडीच्या विशेष न्यायालयाने 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानुसार आज राऊत यांची कोठडी संपली. त्यामुळे त्यांना आज कोर्टात हजर करण्यापूर्वी जेजे रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना ईडीच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं. कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना लगेच 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे राऊत यांना पुन्हा एकदा आर्थर रोड तुरुंगात राहावं लागणार आहे. 5 सप्टेंबर रोजीच त्यांच्या पुढील सुनावणीवर निर्णय होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

राऊतांकडून तक्रार नाही

दरम्यान, आज राऊत यांनी कोर्टात कोणतीही तक्रार केली नसल्याचं सांगण्यात आलं. मागच्यावेळी राऊत यांनी कोर्टातील गैरसोयींची तक्रार केली होती. त्यांना कोंदट रुममध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होत असल्याचं राऊत यांनी म्हटलं होतं. त्यावर कोर्टानेही हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलं होतं. तर राऊत यांना एसी रुममध्ये ठेवण्यात आल्याचा दावा ईडीने केला होता. दरम्यान, राऊत यांना घरचे जेवण देण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच राऊत यांना कोठडीत एक वही देण्यात आली आहे. त्यामुळे राऊत यांचं कोठडीतही लिखाण सुरू आहे.