शरद पवारांचा गावागावात राष्ट्रवादी पोहोचवण्याचा प्लॅन एका क्लिकवर

| Updated on: Dec 12, 2020 | 3:40 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांनी फुले, शाहू, आंबेडकरांनी दिलेल्या विचाराची दृष्टी स्वीकारण्याचे आवाहन केले. (Sharad Pawar)

शरद पवारांचा गावागावात राष्ट्रवादी पोहोचवण्याचा प्लॅन एका क्लिकवर
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वसर्वो शरद पवार आज 81व्या वर्षात पदार्पण करत आहेत. मुंबईतील अभिष्टचिंतन कार्यक्रमात शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस गावागावात पोहोचवण्याचं आवाहन केले.  राष्ट्रवादी काँग्रेस गावागावात पोहोचवण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचाराच्या दृष्टीनं काम करण्याचा मंत्र शरद पवारांनी दिला. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी विज्ञानाचा आधार घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गावागावात आधुनिकता आणि विज्ञानाच्या विचाराची पिढी निर्माण करण्याचं आपलं काम आहे, असं शरद पवार म्हणाले. (Sharad Pawar appeal to follow thoughts of Mahatma Phule, Rajarshi Shau Maharaj and Dr. Babasaheb Ambedkar)

जी विचारधारा आपण स्वीकारली, जीवनाचे जे सूत्र स्वीकारले त्या रस्त्यानं जाण्याचा अखंड प्रयत्न करायचा असतो. हे केल्यास अन्य पिढीतील लोकांना प्रेरणा देतो. सार्वजनिक जीवनात आपण सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहोत. शेवटच्या माणसाच्या हितासाठी आपण लक्ष देतो, तेव्हा आपल्याला पुढचा मार्ग कोणता याची स्पष्टता येते. जागृत राहून समाजकारण करता आलं पाहिजे. गेल्या 50 वर्षांपासून काम करत आहे. महाराष्ट्रातील जनतेने आणि कार्यकर्त्यांनी साथ दिली. त्यामुळे इथपर्यंत पोहोचलो, असं शरद पवार म्हणाले.

आईची आठवण

शरद पवार यांनी यावेळी बोलताना त्यांच्या आई शारदाबाई पवार यांचा आवर्जून उल्लेख केला. महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरुंच्या विचारानं काम केले पाहिजे, ही भूमिका आईनं घेतली. यासोबत कौटुंबिक जबाबदारी पाळली पाहिजे, ही शिकवण आईकडून मिळाली. त्यांच्या शिकवणीवर चालण्याचं काम केलं, असंही ते म्हणाले. (Sharad Pawar appeal to follow thoughts of Mahatma Phule, Rajarshi Shau Maharaj and Dr. Babasaheb Ambedkar)

फुले-शाहू-आंबेडकरांच्या दृष्टीचा स्वीकार करण्याची गरज

महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख करुन चालणार नाही. त्यांनी आपलेल्या दिलेल्या दृष्टीवर चालण्याचं काम आपल्याला केलं पाहिजे. महात्मा फुले खेड्यात जन्माला आले, पण त्यांनी आधुनिकतेचा पुरस्कार केला. पंचम जॉर्ज यांना महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसदर्भात दिलेल्या निवेदनाची आठवण शरद पवारांनी करुन दिली. हा देश शेतीप्रधान आहे. शेतकरी जुनीच बियाणं वापरतात, त्यांना नवीन संकरित बियाणं द्यावीत. दूधाच्या व्यवसायात प्रगतीसाठी गायींची नवीन जात निर्माण करण्याची मागणी महात्मा फुलेंनी केली होती. जोतिबा फुलेंनी आधुनिक विज्ञानाचा स्वीकार करुन समाजासमोर आदर्श निर्माण केला. महात्मा फुलेंच्या जीवनातील उदाहरण देऊन शरद पवार यांनी शेतकऱ्यांना आधुनिकतेचा स्वीकार करण्याचा अप्रत्यक्ष सल्ला दिला.

राजर्षी शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंचा आधुनिक दृष्टीकोन स्वीकारला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यापूर्वीच्या सरकारच्या मंत्रिमंडळात यांनी जलसंपदा आणि वीज मंत्रिपद भूषवले. देशात सुबत्ता आणण्यासाठी पाण्याचा संचय करण्यासाठी धरणं बांधली पाहिजेत. त्यांनी जलविद्युत प्रकल्प उभारण्याची गरज मांडली आणि तो विचार प्रत्यक्षात आणला. भाक्रा नांगल धरण प्रकल्प उभारुन जलविद्युत प्रकल्प प्रत्यक्षात आणला, असंही शरद पवार म्हणाले. (Sharad Pawar appeal to follow thoughts of Mahatma Phule, Rajarshi Shau Maharaj and Dr. Babasaheb Ambedkar)

महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी विज्ञानाचा विचार मांडला. त्या विचारानं पुढे जाण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्या दिशेने पुढे जावं लागेल.  राजकारणात संधी मिळते. संधीचं सोनं करायचं असते. त्या संधींचे सोनं करणारी पिढी गावागावात निर्माण केली पाहिजे. प्रगत जीवनासाठीची पिढी निर्माण करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसनं गावागावात करावं, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या: 

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त धनंजय मुंडे यांचे 2 योजनांचे गिफ्ट

महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. आंबेडकरांच्या आधुनिक दृष्टीचा स्वीकार करावा लागेल: शरद पवार

(Sharad Pawar appeal to follow thoughts of Mahatma Phule, Rajarshi Shau Maharaj and Dr. Babasaheb Ambedkar)