चाळीस वर्ष गवत उपटलं का? नाव न घेता पवारांचा मधुकर पिचडांना सवाल

| Updated on: Oct 13, 2019 | 3:09 PM

अनेक वर्षे सोबत असलेले सहकारी सोडून गेले. आदिवासींचा विकास करण्यासाठी गेलो असं ते सांगतात. मग चाळीस वर्षे काय गवत उपटत होतात काय? असा सवाल शरद पवार यांनी मधुकर पिचड यांना उद्देशून केला

चाळीस वर्ष गवत उपटलं का? नाव न घेता पवारांचा मधुकर पिचडांना सवाल
Follow us on

अहमदनगर : आदिवासींचा विकास करण्यासाठी पक्ष सोडून गेलो असं सांगता, मग चाळीस वर्ष गवत उपटत होतात काय? असा घणाघाती सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपचा झेंडा हाती घेणाऱ्या मधुकर पिचड यांना (Sharad Pawar on Madhukar Pichad) अप्रत्यक्षपणे केला. समोर पैलवान नाही म्हणता, तर मग पंतप्रधान आणि गृहमंत्री इकडे काय भंडारदरा धरण पहायला येतात का? असा सवालही त्यांनी केला.

अहमदनगरमधील अकोले येथील प्रचारसभेत शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यावर पुन्हा टीका केली. अनेक वर्षे सोबत असलेले सहकारी सोडून गेले. आदिवासींचा विकास करण्यासाठी गेलो असं ते सांगतात. मग चाळीस वर्षे काय गवत उपटत होतात काय? असा सवाल पवार यांनी (Sharad Pawar on Madhukar Pichad) यावेळी केला. अकोले मतदारसंघाचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत उपस्थितांशी पवारांनी संवाद साधला.

पवार यांनी यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही हातवारे करत टीका केली. मी कुस्ती संघटनेचा अध्यक्ष आहे, त्यामुळे कुस्ती कोणाशी आणि कशी खेळतात हे मला चांगले ठाऊक आहे. यांच्याशी काय कुस्ती खेळायची? असं म्हणत पवारांनी पुन्हा हातवारे केले.

शरद पवार यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

>> समोर पैलवान नाही म्हणता, तर मग पंतप्रधान आणि गृहमंत्री इकडे काय भंडारदरा धरण पहायला येतात का?

>> मी कुस्ती संघटनेचा अध्यक्ष आहे, त्यामुळे कुस्ती कोणाशी आणि कशी खेळतात हे मला चांगले ठाऊक आहे. यांच्याशी काय कुस्ती खेळायची ? मी कुस्ती संघटनेचा अध्यक्ष होतो. ( पुन्हा पवारांचे आक्षपार्ह हातवारे )

>> गेल्या पाच वर्षांत अरबी समुद्रात शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यासाठी एक वीटही सरकारला रचता आली नाही.

>> जेथे शिवाजी महाराजांची तलवार तेजाने चमकली, आज त्या गड-किल्ल्यांवर दारुचे अड्डे सुरू करण्याचे काम या सरकारने चालवले आहे.

>> राज्यात यावर्षी 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तर, सरकार सांगत आहे की आम्ही 31 टक्के लोकांची कर्जमाफी केली आहे. पण राज्यातील 69 टक्के लोकांचे काय?

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे-मागे फिरुन गृहमंत्री झालेले आज आम्हाला विचारतात काय काम केले?

>> महाराष्ट्र, उत्तर प्रदेश असो वा कोणतेही राज्य, यांच्या राज्यात स्त्रियांचा सन्मान केला जात नाही.

>> सत्तेचा गैरवापर करण्याचे काम या राजवटीमध्ये घडत असल्याने त्यांच्या हातामध्ये पुन्हा सत्ता न देण्याचा निर्णय घ्यावा लागेल.

>>आदिवासींचा विकास करण्यासाठी पक्ष सोडून गेलो असं सांगता, मग चाळीस वर्ष गवत उपटत होतात काय? (Sharad Pawar on Madhukar Pichad) मधुकर पिचड यांना नाव न घेता टोला

>> विरोधकांना संकटात आणण्यासाठी ईडी, सीबीआय यांचा सरकारकडून वापर केला जातो.

>> माझ्यावर खटला भरला असला तरी चिंता करु नका. पण माझ्यासारख्याची अशी अवस्था होत असेल तर सर्वसामान्यांचे काय अवस्था केली जाईल. त्यामुळे सत्तेचा गैरवापर करायचा ही भूमिका घेऊन राज्य चालवणाऱ्यांच्या हातामध्ये पुन्हा सत्ता द्यायची का, याचा विचार करण्याची गरज असून आता राज्यात बदल करण्याची वेळ आली आहे