“नवनीत राणा घरीच असतील चुलीवर…”, लाडकी बहीण योजनेवरून संजय राऊत यांचा निशाणा काय?

"राणा दाम्पत्यांनी या १५०० रुपयात घर चालवून दाखवावं. त्यांच्या पत्नी आता घरीच असतील चुलीवर त्यांनी सांगावं १५०० रुपयात घर चालतं का?" असेही संजय राऊत म्हणाले.

नवनीत राणा घरीच असतील चुलीवर..., लाडकी बहीण योजनेवरून संजय राऊत यांचा निशाणा काय?
| Updated on: Aug 13, 2024 | 11:11 AM

Sanjay Raut Comment Ravi Rana : यंदाच्या निवडणुकीत जर तुम्ही आम्हाला भरभरुन आशीर्वाद दिलात तर या 1500 रुपयांचे 3000 रुपये होतील. पण जर हे पैसे दिले नाही तर मी पण तुमचा भाऊ आहे, हे 1500 रुपये परत घेईन, असे विधान बडनेराचे आमदार रवी राणा यांनी केले. रवी राणा त्यांच्या वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत आले. रवी राणा यांच्या या वक्तव्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रवी राणांवर निशाणा साधला. हे पैसे तुमच्या खिशातून आले आहेत का? हे पैसे काढून घेणारे तुम्ही कोण? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रवी राणा, नवनीत राणा आणि महायुती सरकारवर जोरदार टीका केली. सरकारने जाहीर केलेल्या या योजना लाडक्या बहिणींसाठी नसून किंवा बेरोजगार महिलांसाठी नसून त्या फक्त मतं विकत घेण्यासाठी आहेत. त्यांच्या आणि त्या सरकाराला पाठिंबा देणाऱ्यांच्या भावना किती कलुषित आहे. हे पैसे त्यांच्या खिशातून आले आहेत का? हे पैसे काढून घेणारे तुम्ही कोण? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला.

“त्या पैशांवर बहि‍णींचाही हक्क”

अमरावतीत रवी राणा यांच्या पत्नी अमरावतीतून पराभूत झाल्या आहेत. त्यामुळे त्यांची मानसिकता तपासून घ्यावी लागेल आणि यावेळी तेही पराभूत होणार आहेत. सत्ताधारी पक्षाचे महाराष्ट्रातील अनेक आमदार, नेते आणि मंत्री वारंवार हीच भाषा बोलत आहेत. १५०० रुपये देतोय, मत द्या, नाहीतर आम्ही १५०० रुपये परत घेऊ, असे वारंवार बोलत आहेत. हे त्यांच्या बापाचे पैसे आहेत का? हा सरकारचा पैसा आहे, जनतेच्या करातील पैसा आहे. ज्या पैशांवर त्या बहि‍णींचा हक्क आहे. त्यांचाही कर सरकारमध्ये गेलाय, त्यातून त्यांना पैसे मिळत आहे. या सर्वांची मानसिकता भ्रष्ट आहे, मतं विकत घेण्याची आहे. ती योजना सरकारी पैशातून मतं विकत घेण्याची आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

“१५०० रुपयात घर चालवून दाखवावं”

उद्धव ठाकरेंनी ही योजना सरकारची आहे. महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे सांगितले आहे. पण जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा या १५०० रुपयात आम्ही नक्की वाढ करु. फक्त १५०० रुपयात घर चालतं का? राणा दाम्पत्यांनी या १५०० रुपयात घर चालवून दाखवावं. त्यांच्या पत्नी आता घरीच असतील चुलीवर त्यांनी सांगावं १५०० रुपयात घर चालतं का? असेही संजय राऊत म्हणाले.