आनंद दिघे यांच्या मृत्यू प्रकरणावरुन पुन्हा मोठा दावा, शिवसेनेला नेमकं काय म्हणायचंय?

आनंद दिघेंच्या मृत्यूवरुन शिंदेंच्या शिवसेनेच्या मिनाक्षी शिंदेंनी काल एक विधान केलं. त्या विधानावरुन पुन्हा एकदा दिघेंच्या मृत्यूवरुन पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

आनंद दिघे यांच्या मृत्यू प्रकरणावरुन पुन्हा मोठा दावा, शिवसेनेला नेमकं काय म्हणायचंय?
| Updated on: Apr 06, 2023 | 11:42 PM

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या नेत्या मिनाक्षी शिंदे यांच्या विधानानं पुन्हा एकदा आनंद दिघे यांच्या मृत्यूचा मुद्दा चर्चेत आलाय. आक्षेपार्ह फेसबूक पोस्ट प्रकरणी जो वाद झाला, त्यानंतर ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे (Roshni Shinde) दवाखान्यात दाखल आहेत. त्यांना काल उद्धव ठाकरे भेटून गेले. मात्र जसं दिघेंच्या वेळी घडलं होतं, ते घडू नये, असं म्हणत मिनाक्षी शिंदेंनी पुन्हा एकदा नवा विषय छेडलाय.

“आनंद दिघेंच्या मृत्यू प्रकरणावर एवढ्या वर्षांनी संशय का निर्माण केला जातोय? 22 वर्षांनी या सगळ्या गोष्टी स्वार्थी राजकरणासाठी सुरू झाल्या आहेत. 22 वर्षात आनंद दिघेच्या विषयी का बोलला नाहीत? दिघे साहेब गेले होते तेव्हा अनेक नेते त्यांना भेटून गेले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप नेते नारायण राणे, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटून गेले होते. मिनाक्षी शिंदेना संशय निर्माण करायचा असेल बोट प्रत्येकाकडे जाईल. मी दिघे साहेबांना अग्नी दिला. रोशनी शिंदेच्या विषयात दिशाभूल करण्यात आलीय”, असं केदार दिघे म्हणाले.

निलेश राणेंनी सुद्धा केलेला खळबळजनक दावा

आनंद दिघे एका अपघातानंतर दवाखान्यात दाखल झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूमुळे संतापलेल्या लोकांनी हॉस्पिटलला आग लावली. मात्र हा मृत्यू होता की अजून काही, याबद्दल अनेकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. 4 वर्षांपूर्वी निलेश राणेंनी दिघेंच्या मृत्यूबद्दल नवा दावा करुन खळबळ उडवून दिली होती. मात्र दिघेंचा मृत्यूमागे कोणताही घातपात नव्हता, निलेश राणेंना त्याबद्दल मी व्यवस्थित माहिती देईन, असं म्हणत खुद्द नारायण राणेंनीच त्या चर्चेला पूर्णविराम दिला होता.

मिनाक्षी शिंदेंनी म्हटलंय की दिघेंच्या वेळी उद्धव ठाकरे भेटून गेल्याच्या अर्धा तासात दिघेंचा मृत्यू झाला होता. मृत्यूचा प्रसंग धर्मवीर सिनेमातही दाखवला गेलाय. सिनेमात आधी राज ठाकरे दिघेंच्या भेटीला पोहोचतात. राज ठाकरे भेट घेऊन परतत असताना दिघेंना पाहण्यासाठी नारायण राणे पोहोचतात. राणे तब्येतीची विचारपूस करुन माघारी फिरतात.

यादरम्यान आनंद दिघे आपल्या समर्थकांना खिडकीतून हात दाखवतात. नंतर दिघेंच्या हृदयाच्या ठोके वाढतात अन् त्यांचा मृत्यू होतो. मृत्यूची बातमी समजल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच रुग्णालयात येतात. दिघेंच्या मृत्यूची बातमी समजताच जमाव नियंत्रणाबाहेर जातो. संतप्त लोक रुग्णालयाला आग लावून टाकतात. राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत असतात. मात्र मिनाक्षी शिंदेंना दिघेंच्या मृत्यूचा प्रसंग सांगून पुन्हा आता काय म्हणायचं होतं, हे अस्पष्ट आहे.