सर्वात मोठी बातमी! ठाणे कोर्टाचा न्यायनिवाडा, रोशनी शिंदे यांना दिलासा, शिवसेनेला मोठा झटका
रोशनी शिंदे यांना ठाणे कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी हा मोठा झटका मानला जातोय. रोशनी शिंदे यांना मारहाण प्रकरणावरुन गेल्या तीन दिवसांपासून ठाण्यातील राजकारण तापलं आहे.

ठाणे : ठाण्यात गेल्या तीन दिवसांपासून राजकारण चांगलंच पेटलं आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे (Roshni Shinde) यांना शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या मारहाणीमुळे रोशनी शिंदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या मारहाणीमुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. त्या रुग्णालयात ऑक्सिजन बेडवर उपचार घेत होत्या. त्यांच्यासोबत झालेल्या या घटनेनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: कुटुंबासह ठाण्यात आले. त्यांनी रोशनी यांची भेट घेत विचारपूस केली आणि पोलिसांकडे कारवाईची मागणी केली. दुसरीकडे रोशनी यांच्याविरोधात दोन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला. या प्रकरणी ठाणे कोर्टाने रोशनी शिंदे यांना दिलासा दिला आहे.
रोशनी शिंदे यांनी फेसबुकवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वादग्रस्त पोस्ट टाकली होती. याच पोस्टवरुन हा वाद उफाळला. सुरुवातीला हा वाद फेसबुकपुरता मर्यादित होता. त्यानंतर हा वाद पुढे थेट रस्त्यावर पोहोचला. शिवसेनेच्या महिला नेत्या थेट रोशनी यांच्या कार्यालयात गेल्या. तिथे बाचाबाची झाली. त्यानंतर रोशनी यांना घोळक्याकडून मारहाण करण्यात आली. या मारहाण प्रकरणी पोलिसांकडून सुरुवातीचे दोन दिवस गुन्हा दाखल करण्यात आला नाही. आपण मारहाणी प्रकरणी तपास करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तर दुसरीकडे पोलिसांनी रोशनी शिंदे यांच्याविरोधातच गुन्हा दाखल केला.
रोशनी यांच्याविरोधात दोन ठिकाणी गुन्हे दाखल
रोशनी शिंदे यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा ठपका ठेवत त्यांच्याविरोधात दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. शिवसेनेच्या वतीने कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर भाजपच्या वतीने नौपाडा पोलीस ठाण्यापमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी रोशनीच्या वतीने ठाणे कोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आलेला. अखेर या प्रकरणात रोशनी शिंदे यांना ठाणे कोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. हा खरंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जातोय.
रोशनी शिंदे यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रोशनी शिंदे यांच्यावर करण्यात आलेल्या मारहाण प्रकरणाची राज्य महिला आयोगाने देखील दखल घेतली आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणी पोलिसांना संबंधित प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून बुधवारी ठाण्यात मोर्चा काढण्यात आलेला. या मोर्चात शिवसेना आणि ठाणे पोलीस आयुक्तांवर निशाणा साधण्यात आलेला. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलेलं.
