एकनाथ शिंदे यांच्या एका शिलेदाराच्या विधानाने भाजपवर मौन राहण्याची वेळ, नेमकं प्रकरण काय?

| Updated on: Apr 19, 2023 | 11:21 PM

अजित पवार भाजपसोबत जाण्यावरुन शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानानं भाजपची गोची झालीय. अजित पवार भाजपसोबत येण्यावर आमच्याकडे निरमा पावडर आहे, असं गायकवाडांनी म्हटलंय. याबद्दल भाजप नेते मात्र मौन आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या एका शिलेदाराच्या विधानाने भाजपवर मौन राहण्याची वेळ, नेमकं प्रकरण काय?
Follow us on

मुंबई : हसत-हसत का होईना विरोधकांच्याच आरोपांना दुजोरा देत आमदार शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी भाजपवरच्या (BJP) दबावतंत्रावर बोट ठेवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादीचा गट भाजपसोबत आणत नव्हते, तर थेट त्यांच्या भाजपप्रवेशाचीच चर्चा सुरु होती, असा दावा संजय गायकवाड यांनी केलाय. तसेच आमच्याकडे निरमा पावडर असल्याचं देखील गायकवाड यावेळी म्हणाले. विशेष म्हणजे हा आरोप चारच दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही केला होता.

आता कमालीचा विरोधाभास असा आहे की, अजित पवार यांच्यावरचे भ्रष्टाचाराचे आरोप भाजपकडच्या निरमा पावडरनं धुतले जातील, असं संजय गायकवाड यांचं म्हणणं आहे. मात्र अजित पवारांनीच महिन्याभरापूर्वी भाजप प्रवेशानंतर चौकशा कशा थांबतात, यावरुन टीका केली होती. विशेष म्हणजे भाजप प्रवेश केला की, नेत्यांवरचे आरोप हे गुजरातच्या निरमा पावडरनं धुतले जातात, हे खुद्द भाजप नेतेच जाहीरपणे बोलतात. भाजपचे विधानपरिषदेतले आमदार रमेश पाटील यांनी तसं विधान केलं होतं.

आमदार रमेश पाटील नेमकं काय म्हणाले होते?

महिन्याभरापूर्वी ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई शिंदे गटात आले. त्याच भूषण देसाईंवर 400 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप असल्याचं खुद्द भाजप आमदार रमेश पाटील यांनी सांगितलं आणि ते आरोप गुजरातच्या पावडरनं धुतले जातील, असंही ते जाहीरपणे सभागृहात म्हणाले.

हे सुद्धा वाचा

भाजपविरोधात असताना गुलाबराव पाटील यांचाही निशाणा, पण आता…

दुसरी गंमत म्हणजे अजित पवार भाजपसोबत सत्तेत यावेत यासाठी मंत्री गुलाबराव पाटील आग्रही आहेत. तारखा, तिथा आणि मुहूर्ताबद्दल ते माध्यमांना अपडेट देतायत. मात्र हेच गुलाबराव पाटील जेव्हा ठाकरेंसोबत होते, तेव्हा निरमा पावडरवरुन त्यांनी भाजपवर टीका केली होती. हर्षवर्धन पाटीलही जाहीरपणे म्हटले होते की भाजपत गेल्यावर शांत झोप लागते. चौकशा होत नाहीत. सांगलीचे भाजप खासदार संजयकाकाही म्हणतात की मी भाजपत असल्यामुळे ईडी माझ्याकडे येत नाही.

एकीकडे भाजप नेते म्हणतात की, तपासयंत्रणा स्वायत्त आहेत. पण दुसरीकडे त्यांचेच नेते भाजपत गेल्यावर भ्रष्टाचाराचे सारे डाग निरमा पावडरनं धुतले जातात, हे जाहीरपणे सांगायला घाबरत नाहीत. तूर्तास संजय गायकवाड यांच्या या ताज्या विधानाबद्दल आम्ही भाजप नेत्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी प्रतिक्रियेस नकार दिला.