शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता ते खासदार, जाणून घ्या कोण आहेत राजन विचारे?

| Updated on: May 18, 2021 | 4:07 PM

राजन विचारे शिवसेनेचे नगरसेवक झाले. यानंतर ते ठाण्यातील शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक म्हणून गणले जाऊ लागले. | Rajan Vichare Shivsena

शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता ते खासदार, जाणून घ्या कोण आहेत राजन विचारे?
Follow us on

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या करिष्म्याने अनेक तरुणांना पक्षाशी जोडले. यापैकी अनेक तरुणांनी राजकारणात बस्तान बसवल्यानंतरही आजपर्यंत शिवसेनेची साथ सोडलेली नाही. अशा नेत्यांपैकी एक नाव म्हणजे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे. एकेकाळी शिवसेनेचे नगरसेवक असणाऱ्या राजन विचारे (Rajan Vichare) यांनी सलग दोन टर्म ठाणे मतदारसंघातून विजय होण्याची कामगिरी करुन दाखविली आहे. या विजयात शिवसेनेचा मोठा वाटा असला तरी राजन विचारे यांचा दांडगा जनसंपर्क हादेखील विजयात तितकाच महत्त्वाचा फॅक्टर ठरला. (Shiv Sena MP Rajan Vichare Political journey)

कोण आहेत राजन विचारे?

1 ऑगस्ट 1961 रोजी मुंबईत राजन विचारे यांचा जन्म झाला. एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात त्यांचे बालपण केले. तरुणपणी बाळासाहेब ठाकरे यांच्या करिष्म्याकडे आकर्षित होत राजन विचारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या काळात त्यांनी बराच संघर्ष केला. 1985 साली राजन विचारे यांनी शिवसेनेचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करायला सुरुवात केली. या काळात ते शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे समर्थक होते. पुढील काळात राजन विचारे शिवसेनेचे नगरसेवक झाले. यानंतर ते ठाण्यातील शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक म्हणून गणले जाऊ लागले. काही काळ ते ठाणे महानगरपालिकेचे महापौरही होते. 2009 साली ते विधानपरिषदेवरही निवडून गेले.

आनंद परांजपेंचा पराभव करुन लोकसभेत प्रवेश

2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत राजन विचारे यांनी तत्कालीन खासदार संजीव नाईक यांचा तब्बल 2.80 लाख इतक्या मताधिक्यांनी पराभव केला होता. तर 2019 साली राजन विचारे यांच्या उमेदवारीला अनेकांचा विरोध असूनही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनंद परांजपे यांचा पराभव केला होता.

‘खासदार होऊनही नगरसेवकाच्या मानसिकतेतच वावरतात’

राजन विचारे यांच्या राजकारणाचा बहुतांश काळ हा ठाण्यातील स्थानिक राजकारणात व्यतीत झाला आहे. विचारे यांनी नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार अशी विविध पदे भूषविली. त्यामुळे राजन विचारे यांना ठाण्याबाहेरच्या राजकारणात तितकासा रस नसल्याचा आरोप होतो.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टर्ममध्ये भाजपच्या अनेक नेत्यांनी राजन विचारे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. राजन विचारे खासदार झाले तरी नगरसेवकाच्या मानसिकतेत वावरतात, असा भाजपच्या अनेक नेत्यांचा आक्षेप होता.

महाराष्ट्र सदनातील राड्यामुळे दिल्लीत चर्चा

खासदार झाल्यानंतर 2015 साली दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात राजन विचारे यांनी घातलेला राडा चांगलाच गाजला होता. महाराष्ट्र सदनात निकृष्ट भोजन दिले जाते, याविरोधात त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यावेळी राजन विचारे यांनी रमजानचा रोजा ठेवणाऱ्या एका मुस्लिम कर्मचाऱ्याच्या तोंडात बळजबरीने चपाती कोंबली होती. त्यावरुन बराच वादंग निर्माण झाला होता.

(Shiv Sena MP Rajan Vichare Political journey)