या पाच जागांवर युतीचं घोडं अडलं, मुख्यमंत्र्यांचे पीए वेटिंगवर

| Updated on: Sep 26, 2019 | 8:46 PM

बेलापूर, ऐरोली, गोरेगाव, वडाळा आणि औसा या मतदारसंघांमध्ये युतीचं घोडं अडलं (Shivsena BJP alliance barriers) आहे. युती करायची असेल तर या मतदारसंघांमध्ये शिवसेना-भाजपला जागांची अदलाबदली करावी लागेल. पण विद्यमान आमदार असलेल्या जागा भाजप सोडणार का हा प्रश्न आहे.

या पाच जागांवर युतीचं घोडं अडलं, मुख्यमंत्र्यांचे पीए वेटिंगवर
Follow us on

मुंबई : विधानसभेच्या उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होत असतानाच भाजप-शिवसेनेच्या जागा वाटपाचा पेच कायम आहे. राज्यातील पाच मतदारसंघात (Shivsena BJP alliance barriers) दोन्ही पक्षांकडून एकमेकांविरोधात कुरघोड्या सुरु असल्याचं चित्रं आहे. गोरेगाव, बेलापूर, ऐरोली, वडाळा आणि औसा या पाच मतदारसंघांमध्ये युतीचं घोडं अडलं (Shivsena BJP alliance barriers) आहे. युती करायची असेल तर या मतदारसंघांमध्ये शिवसेना-भाजपला जागांची अदलाबदली करावी लागेल. पण विद्यमान आमदार असलेल्या जागा भाजप सोडणार का हा प्रश्न आहे.

बेलापूर

युतीच्या जागावाटपात सर्वात मोठा तिढा बेलापूरचा आहे. बेलापूरमध्ये सध्या भाजपच्या मंदा म्हात्रे आमदार आहेत. पण शिवसेनेने या मतदारसंघावर दावा ठोकला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही युती होवो अथवा ना होवो, पण बेलापूर मतदारसंघ सोडणार नाही, अशी भूमिका घेतली. तर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी त्यांच्या बेलापूरच्या विजय संकल्प रॅलीतही याविषयी सुतोवाच केलं. त्यामुळे नुकतेच भाजपात दाखल झालेले गणेश नाईक आणि मंदा म्हात्रेंची कोंडी करण्यासाठी शिवसेना बेलापूरच्या जागेवर अडून बसल्याचं चित्रं आहे.

ऐरोली

ऐरोली मतदारसंघातही शिवसेनेने राष्ट्रवादीतून भाजपात दाखल झालेले संदीप नाईकांची कोंडी करण्यासाठी कंबर कसली आहे. गणेश नाईक आपल्या 48 नगरसेवकांसह भाजपात आल्याने नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे. पण, इथे शिवसेना नेते विजय नाहटा यांनी आपली जोरदार मोर्चेबांधणी चालू केल्याचं चित्रं आहे.

वडाळा

मुंबईतील वडाळा मतदारसंघावरुन भाजप-शिवसेनेत वाद निर्माण झालाय. युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. पण, काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकरांच्या रुपाने भाजपला तगडा उमेदवार मिळाला आहे. त्यामुळे आता भाजपने या मतदारसंघावर दावा ठोकलाय.

कोळंबकर तब्बल सात वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. 2014 मध्ये निसटता विजय मिळाल्याने 2019 मध्ये आपली जागा भक्कम करण्यासाठी भाजपप्रवेश केला. पण, आता वडाळ्याची जागा युतीच्या मार्गातील अडथळा बनली आहे. त्यामुळे युतीमध्ये गडबड झाल्यास कोळंबकर यांना शिवसेनेशी टक्कर द्यावी लागण्याची शक्यता आहे.

औसा

लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांच्या जागेसाठी युतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. युतीच्या जागावाटपात औसाची जागा शिवसेनेकडे आहे. पण, मुख्यमंत्र्यांचे खाजगी स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांच्या उमेदवारीसाठी भाजपने शिवसेनेच्या परंपरागत मतदारसंघ औसावर दावा ठोकलाय.

औसा मतदारसंघात गेल्यावेळी भाजपने पाशा पटेलांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसचे आमदार बसवराज पाटील मुरूमकरांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर पाशा पटेलांनी औसाकडे फारसं लक्ष दिलं नाही. याचाच फायदा घेत अभिमन्यू पवार यांनी विकासकामांचा धडाकाच लावला आणि आता ते थेट उमेदवारीसाठी तयार झाले आहेत.

गोरेगाव

भाजपच्या विद्या ठाकूर आमदार असलेला गोरेगाव मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई या मतदारसंघातून 1990, 2004 आणि 2009 ला आमदार होते. पण 2014 ला त्यांचा विद्या ठाकूर यांनी पराभव केला.

VIDEO :